मुंबई, १५ एप्रिल (हिं.स.)।महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात मोठी अपडेट दिली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या महिलांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आधीच लाभ मिळत आहे अशा राज्यातील 8 लाख महिलांना आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपयांऐवजी ५०० रुपये मासिक मिळणार आहेत.
राज्यातील तब्बल ८ लाख लाडक्या बहिणींना आता यापुढे प्रत्येक महिन्याला फक्त ५०० रूपयांचा लाभ मिळणार आहे. कारण, त्या आधीच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत १००० रूपयांचा लाभ घेत आहेत. लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार, लाभार्थ्यांना इतर सरकारी योजनांचा लाभ मिळू शकतो, पण प्रत्येक महिन्यांचा लाभ १,५०० रुपयांपेक्षा जास्त नसावा.
विधानसभा निवडणुकीआधी लाडकी बहीण योजना सुरु झाली तेव्हा महिलांना सरसकट लाभ देण्यात आला होता. पण विधानसभा निवडणुका झाल्यानंतर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची कसून तपासणी सुरू केली आहे. फक्त पात्र महिलांनाच लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळावा, त्यासाठी सरकारकडून पुन्हा तपासणी केली जात आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये लाडकी बहीण योजनेसाठी २.६३ कोटी अर्ज आले होते. तपासणीनंतर ही संख्या ११ लाखांनी कमी होऊन २.५२ कोटींवर आली. फेब्रुवारी आणि मार्च २०२५ मध्ये २.४६ लाख लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत.सध्या प्रत्येक जिल्ह्यांतून आलेल्या अर्जांची तपासणी सुरू आहे. छाननी पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांच्या खात्यात हप्ता जमा केला जाईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
लाडकी बहीण निधी कपातींवरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. लाडक्या बहिणींचा निधी आता ५०० रुपयांवर आलाय, त्यांच्या मतांची किंमत हळूहळू शून्यावर येईल असे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. बहिणींना ५०० रुपये देणाऱ्या सरकारची कीव येतेय. -केंद्राचे पैसे मिळतात म्हणून निधी कमी करणे हे चूक असल्याचं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी घणाघात केलाय.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode