
रायगड, 14 मार्च (हिं.स.)। पनवेल परिसरात घरगुती गॅस सिलेंडरबाबत विविध अफवा पसरत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि घबराट निर्माण होत आहे. मात्र प्रत्यक्षात घरगुती गॅसवर कोणतेही निर्बंध नसून त्याचा तुटवडाही नाही, असे स्पष्ट करत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.
सध्या काही ठिकाणी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या वापराबाबत निर्बंध लागू करण्यात आले असले तरी घरगुती गॅसच्या पुरवठ्यावर कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नाही. तरीही काही माध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेकजण आवश्यकता नसतानाही गॅस एजन्सीवर गर्दी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्थानिक पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना गॅस वितरकांशी संपर्क साधून वस्तुस्थिती जाणून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नगरसेवक दशरथ म्हात्रे, नगरसेविका अस्मिता जगदीश घरत तसेच युवा नेते अतुल घरत यांनी गॅस वितरण एजन्सीला भेट देऊन आढावा घेतला. यावेळी घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याची माहिती समोर आली.
याशिवाय खबरदारीच्या उपाययोजनेतून तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांच्याशीही चर्चा करण्यात आल्याचे ठाकूर यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन गॅस एजन्सीवर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.घरगुती गॅस संदर्भात काही अडचण असल्यास नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा, त्यांना आवश्यक ती मदत केली जाईल, असे आश्वासनही आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिले. तसेच गॅस वितरण एजन्सींनीही घरगुती गॅसचा तुटवडा नसल्याचे स्पष्ट करत अफवांना बळी पडू नये, असे नागरिकांना आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)