धोतर्डी येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत समाधान शिबिर
अकोला, 14 मार्च (हिं.स.) : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार महसूल विभागातर्फे अकोला तालुक्यातील धोतर्डी येथे सांगरूळ महसूल मंडळातील सर्व गावांसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन
Photo


अकोला, 14 मार्च (हिं.स.) : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार महसूल विभागातर्फे अकोला तालुक्यातील धोतर्डी येथे सांगरूळ महसूल मंडळातील सर्व गावांसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराला अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा मुख्य प्रतोद- भाजपा विधिमंडळ (मंत्री दर्जा) रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी वर्षा मीना, अपर आयुक्त सूरज वाघमारे, उपविभागीय अधिकारी (अकोला) शरद जावळे, तहसीलदार कुणाल झाल्टे, अकोला महानगरपालिका नगरसेवक जयंत म्हैसने तसेच सर्व नायब तहसीलदार, मंडळातील ग्रामपंचायतींचे सरपंच व उपसरपंच यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तालुक्यातील विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित होते.

शिबिरादरम्यान जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी महसूल विभागाने राज्याचे महसूल मंत्री यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांसाठी घेतलेल्या विविध निर्णय व योजनांची माहिती दिली. तसेच इतर विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा व योजनांबाबत उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले.

या समाधान शिबिरात मान्यवरांच्या हस्ते नागरिकांना विविध दाखले, सातबारा उतारे, प्रमाणपत्रे, रेशन कार्ड, फेरफार आदी कागदपत्रांचे वाटप करण्यात आले. कृषी विभागामार्फत यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर व ट्रॉलीचे वितरणही करण्यात आले.

तहसील कार्यालय अकोलाच्या संगायो विभागामार्फत शिबिरस्थळी उपस्थित दिव्यांग व इतर लाभार्थ्यांचे अपडेटेशन, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तसेच हयातीचे प्रमाणपत्रही जमा करून घेण्यात आले.

भविष्यातही असे लोकोपयोगी उपक्रम राबवून थेट जनतेपर्यंत पोहोचून शासकीय योजनांचा लाभ देण्याचे शासनाचे धोरण असल्याचे आमदार रणधीर सावरकर यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

----------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande