अहिल्यानगर , 15 एप्रिल (हिं.स.)। ६७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील वादग्रस्त निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती.अखेर आता या प्रकरणी चौकशी होऊन मुख्य पंच नितिश कावलिया यांच्यावर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने तीन वर्षांसाठी निलंबनाची कारवाई जाहीर केली आहे.
२९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान अहिल्यानगर येथील ६७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ यांनी शिवराज राक्षे यांना ढाक मारत चितपट केल्याचा निर्णय देण्यात आला. मात्र, हा निर्णय अनेकांच्या दृष्टीने विवादित ठरला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने आंतरराष्ट्रीय पंच विलास कथुरे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. या समितीने २८ फेब्रुवारी रोजी आपला अहवाल सादर केला, ज्यामध्ये मुख्य पंच नितिश कावलिया यांची निर्णय प्रक्रिया चुकीची ठरवण्यात आली.
या चौकशीतून निष्पन्न झाले की, चितपटीच्या निर्णयासाठी पंच नितेश कावल्या यांनी मेन्ट चेअरमन व साईड पंचांची सहमती घेतली, मात्र त्या क्षणी राक्षे यांची पाठ स्पष्टपणे कुणालाही दिसत नव्हती. व्हिडीओ फुटेजमध्ये हा निर्णय चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मुख्य पंच नितिश कावलियावर यांच्यावर दोष निश्चित करत, त्यांना तीन वर्षांसाठी कुस्ती पंचगिरीपासून निलंबित करण्यात आले.चौकशी अहवालात मॅट चेअरमन दत्तात्रय माने व साईड पंच विवेक नाईकल यांच्यावर कोणतीही चूक नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यांनी परिस्थितीनुसार योग्य सल्ला व निर्णय दिला असल्याचे अहवालात स्पष्ट झाले.
कुस्तीदरम्यान मॅटच्या आजूबाजूला पाहुणे, अधिकारी, माध्यम प्रतिनिधी यांची प्रचंड गर्दी असल्यामुळे पंचांवर मोठा मानसिक ताण येतो. या तणावात निर्णय घेणे कठीण ठरते. त्यामुळे भविष्यात अशा चुकांपासून बचाव करण्यासाठी पंचांच्या कार्यक्षेत्रात कुणालाही प्रवेश देऊ नये, अशी शिफारस करण्यात आली आहे. या कारवाईमुळे कुस्ती क्षेत्रात पारदर्शकतेचा संदेश गेला असून, भविष्यात अशा प्रकरणांना आवर घालण्यास ही बाब निर्णायक ठरेल, असा विश्वास कुस्तीप्रेमींनी व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode