रत्नागिरी : शांतीपीठ गोशाळा भविष्यात समाजाचे श्रद्धास्थान ठरेल : डॉ. परमार्थ देवजी
रत्नागिरी, 15 एप्रिल, (हिं. स.) : गोमातेवरील प्रेमाची प्रेरणा घेऊन नि:स्वार्थी भावनेने सुरू केलेले शांतीपीठी गोशाळेचे महत्कार्य कौतुकास्पद असून भविष्यात हे स्थान संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास पतंजली योगपीठाचे स्वामी तसे
शांतीपीठ समारंभ


रत्नागिरी, 15 एप्रिल, (हिं. स.) : गोमातेवरील प्रेमाची प्रेरणा घेऊन नि:स्वार्थी भावनेने सुरू केलेले शांतीपीठी गोशाळेचे महत्कार्य कौतुकास्पद असून भविष्यात हे स्थान संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास पतंजली योगपीठाचे स्वामी तसेच योगगुरू श्री रामदेव बाबा यांचे शिष्य डॉ. परमार्थ देवजी यांनी व्यक्त केला.

ते येथील सोमेश्वर शांतीपीठाने आयोजित केलेल्या विश्वमंगल गोशाळेतील कार्यक्रमात बाोलत होते.

सोमेश्वर शांतीपीठ विश्वमंगल गोशाळेचे अध्यक्ष राजेश आयरे यांनी सोमेश्वर शांतीपीठ प्रकल्पाची माहिती दिली. त्यांनी स्वामीजी आणि पतंजली योगविद्यापीठाचे सर्व कार्यकर्ते यांचे स्वागत केले.

यावेळी डॉ. देवजी यांनी सोमेश्वर शांतीपीठाच्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन त्यांच्या कार्याचे मनस्वी कौतुक केले. ते म्हणाले की, गोमाता ही कोट्यवधी देवदेवतांची अधिष्ठात्री आहे. तिची सेवा-शुश्रूषा व संगोपन करणे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराची सेवा करणेच होय. या कार्यात अनेक अडचणी व कठीण प्रसंग येतील, परंतु त्यावरील उपाय व मार्गही गोमातेच्या आशीर्वादाने प्राप्त होतील. निष्काम सेवा कधीही वाया जाणार नाही. उलट भविष्यात या महत्कार्यात आणखी अनेक हात पाठीशी उभे राहतील व शांतीपीठाचे सर्व संकल्प उत्तमरीत्या पूर्ण होतील. हे स्थान म्हणजे सकल समाजासाठी केवळ श्रद्धास्थान न राहता एक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाईल.

यावेळी त्यांच्यासोबत पतंजली योगपीठाचे अनेक मान्यवर उपस्थित होते. शांतीपीठाचे अध्यक्ष राजेश आयरे, श्री. पाटील, श्री. साने, प्रकाश मुळ्ये, अमोल चाटे, सुरेश दाते आदी उपस्थित होते.

कार्यक्रमापूर्वी डॉ. परमार्थ देवजी यांचे सुवासिनींच्या हस्ते पंचारतीने औक्षण करण्यात आले. यावेळी प्रकाश मुळ्ये यांनी केलेल्या एका संकल्पाबद्दल त्यांचा डॉ. देवजींच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande