
परभणी, 17 मार्च (हिं.स.) : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात पार पडला.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी आणि वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ, परभणी संचलित शांताबाई नखाते विद्यालय, पाथरी यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा शिवाजी नगर येथील शांताबाई नखाते विद्यालयात आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यात दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा व पदवीधर उमेदवारांसाठी ट्रेनी ऑपरेटर, क्षेत्र अधिकारी, विमा सल्लागार, विमा सखी तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी अशा सुमारे 200 पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या.
मेळाव्यास एकूण 130 उमेदवार उपस्थित होते. त्यापैकी 74 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळाचे अनिल नखाते होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे उपस्थित होते. तसेच पंचायत समिती पाथरीचे सभापती रामप्रसाद डुकरे, प्रशासकीय अधिकारी आर. एम. टेंगसे आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पाथरीचे सि. एस. उस्तुरगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशन डहाळे यांनी केले. मेळावा यशस्वी होण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातील प्रवीण रुद्रकंठवार, राहुल गजभारे, सचिन चव्हाण, राहुल काळे आणि करिमोद्दीन अन्सारी यांनी विशेष सहकार्य केले.
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis