
रायगड, 17 मार्च (हिं.स.) : अलिबाग येथील रायगड जिल्हा परिषदेत अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील एकजुटीला तडा गेल्याचे चित्र समोर आले आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आधीच ‘सेटिंग’ झाल्याच्या चर्चेमुळे जिल्हा परिषदेत मोठी राजकीय खळबळ उडाली असून वातावरण चांगलेच तापले.
जिल्हा परिषद परिसरात आज सकाळपासूनच गुप्त बैठका, बंद दरवाज्याआड चर्चा आणि नेत्यांची वर्दळ सुरू होती. अर्थसंकल्पाचा आराखडा आधीच ठरवून शिवसेना (शिंदे गट) ला डावलण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप होताच शिवसेना आक्रमक झाली.शिवसेनेच्या गटनेत्या मानसी दळवी यांनी प्रशासनावर जोरदार टीका करत “पडद्यामागील व्यवहार चालणार नाहीत” असा इशारा दिला. त्यानंतर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांची भेट घेतल्याने प्रशासनात खळबळ उडाली.
दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांनीही आक्रमक भूमिका घेत “आम्हाला डावलून कुठलीही बैठक होऊ देणार नाही,” असा इशारा दिला. काही काळ तणाव इतका वाढला की नियोजित बैठक होणार की नाही, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती.
अखेर प्रशासनाने माघार घेत सर्व पदाधिकाऱ्यांना बैठकीत सहभागी करून घेतले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर अर्थसंकल्पाचा आराखडा अंतिम करण्यात आला.
या संपूर्ण घडामोडींमुळे जिल्हा परिषदेत निधी वाटपावरून तीव्र राजकीय संघर्ष सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपल्या मतदारसंघासाठी अधिकाधिक निधी मिळवण्याच्या प्रयत्नात असून, रायगड जिल्हा परिषद अर्थसंकल्प हा विकासाबरोबरच राजकीय शक्तिप्रदर्शनाचा मंच बनल्याचे चित्र समोर आले आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)