मुंबई , 15 एप्रिल (हिं.स.)।‘देशातील टोलनाकेच आता बंद व्हावेत यासाठी केंद्र सरकारने नवी यंत्रणा राबवण्याचा विचार केला आहे’, असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.ते दादरच्या अमर हिंद मंडळाच्या वसंत व्याख्येनमालेत बोलत होते.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टोलसंदर्भात एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. टोलनाक्यांवरील रांगा कमी करण्याकरता सरकार पातळीवर अनेक उपाययोजना आणल्या जात आहेत. त्याकरता फास्ट टॅग पद्धत अनिवार्य करण्यात आली आहे. फास्टटॅगकरताही टोलनाक्यावर गाड्यांना बराच काळ रांगेत उभे रहावे लागते. यासाठी देशातील टोलनाकेच आता बंद व्हावेत, याकरता केंद्र सरकारने नवी यंत्रणा राबवण्याचा विचार केला आहे.असे केंद्रीयमंत्री गडकरी यांनी सांगितले आहे.ते पुढे म्हणाले, “सॅटलाईट बेस फ्री टोलिंग सिस्टिम तयार करतोय. यामुळे टोलनाके राहणार नाहीत. तुम्हाला कोणी अडवणार नाही. कॅमेऱ्याद्वारे तुमच्या नंबरप्लेटवरून टोल निघेल. तुम्ही जिथून निघालात तिथपासून तुम्ही जिथून बाहेर पडाल तिथपर्यंतचाच टोल थेट तुमच्या बँक खात्यातून कापला जाणार आहे.” तसेच या नवीन धोरणात, सरकार लोकांना तीन हजार रुपयांमध्ये फास्टॅग रिचार्ज करण्याची सुविधा देणार आहे. त्यानंतर त्यांना पुढील एक वर्षासाठी कोणत्याही टोल प्लाझावर कर भरावा लागणार नाही असे त्यांनी सांगितले.
--------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode