केंद्र सरकारची माध्यमांसाठी नवी ऍडव्हायझरी जारी
नवी दिल्ली, 09 मे (हिं.स.) : प्रसिद्धी माध्यमांनी संरक्षण दलाच्या कारवायांचे आणि हालचालीचे थेट प्रक्षेपण करु नये, अशी ऍडव्हायझरी केंद्र सरकारने आज, शुक्रवारी जारी केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने ही तिसीर ऍडव्हायझरी जारी केली आहे.
भारत-पाक वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक माध्यम वाहिन्या लष्करी कारवायांचे थेट प्रक्षेपण करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर केंद्र सरकारने हे सल्लागार पुन्हा जारी केले आहे.
संरक्षण मंत्रालयाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, सर्व माध्यम वाहिन्या, डिजिटल प्लॅटफॉर्मंना संरक्षण कारवाया आणि सुरक्षा दलांच्या हालचालींचे थेट प्रक्षेपण किंवा रिअल-टाइम वार्तांकन टाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे. अशा संवेदनशील किंवा स्रोत-आधारित माहितीचे वार्तांकन लष्करी कारवायांना धोका निर्माण करू शकते आणि सैन्याचा जीव धोक्यात आणू शकते.
कारगिलयुद्ध, मुंबईतील 26/11चा दहशतवादी हल्ला, कंदहार अपहरण यासारख्या भूतकाळातील घटना अकाली वार्तांकनाचे धोके अधोरेखित करतात, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स (सुधारणा) नियम, 2021 च्या कलम 6(1)(पी) नुसार, दहशतवादविरोधी कारवायांदरम्यान नियुक्त अधिकाऱ्यांकडून पत्रकार परिषदेत माहिती देण्यात येईल. दक्षता, संवेदनशीलता आणि जबाबदारीपूर्वक वार्तांकन करावे, असे मंत्रालयाने म्हटले आहे. जर कोणत्याही चॅनेलने केबल टीव्ही नेटवर्क सुधारणा कायदा 2021 च्या नियमांचे उल्लंघन केले, तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. विशेषतः संरक्षण कारवाया किंवा हालचालींशी संबंधित कोणतेही रिअल-टाइम प्रक्षेपण, दृश्यांचा प्रसार करु नये. संवेदनशील माहितीचा अकाली खुलासा अनवधानाने शत्रूंना मदत करू शकतो आणि सुरक्षा दलाची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते, असे सरकारने सांगितले आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी