लातूर, 18 एप्रिल (हिं.स.) जल व्यवस्थापन व कृती आराखडा पंधरवडा 2025 अंतर्गत जलसंपदा विभागाच्यावतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी (वय किमान 16 वर्षे व त्याहून अधिक) निबंध आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन लातूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.
निबंध लेखन आणि चित्रकला स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. निबंध आणि चित्र हे दिलेल्या विषयांनुसारच असावेत. निबंध 300 शब्दांपेक्षा जास्त नसावा. तसेच लेखन आणि चित्रकलेसाठी लागणारी सामग्री स्वतःची वापरावी; यासाठी कोणताही परतावा मागता येणार नाही. निबंध किंवा चित्र स्वखर्चाने दिलेल्या पत्त्यावर समक्ष किंवा पोस्टाने पाठवावे; यासाठी कोणताही परतावा मागता येणार नाही. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. प्रथम, द्वितीय आणि तृतीय विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
प्रवेशिका सादर करताना त्यामध्ये स्पर्धेचे नाव, स्पर्धकाचे नाव, शिक्षण, शाळा/महाविद्यालयाचे नाव, वय, संपर्क क्रमांक, पत्ता, दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, ओळखपत्र/आधार कार्डची प्रत सोबत जोडणे आवश्यक आहे. स्पर्धकांनी निबंध अथवा चित्र आणि प्रवेशिकेतील माहिती समक्ष किंवा पोस्टाने कार्यकारी अभियंता, लातूर पाटबंधारे विभाग क्र. 1, सिंचन भवन, पहिला मजला, जुना औसा रोड, प्रिया रेसिडेन्सीजवळ, लातूर-413512 या पत्त्यावर 27 एप्रिल 2025 पर्यंत पाठवावी, असे लातूर पाटबंधारे विभाग क्र. 2 चे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.
निबंध स्पर्धेचे विषय:
जलसंवर्धनासाठी नवीन तंत्रज्ञान
जलसमृद्धी हीच जीवन समृद्धी
लातूर जिल्ह्यातील पाण्याच्या समस्या आणि उपाय
जलसंवर्धन आणि वनसंवर्धन
धरणे, जलाशये आणि कालव्यांचे महत्त्व
चित्रकला स्पर्धेचे विषय:
पाण्याची आवश्यकता आणि महत्त्व
पाण्याची बचत आणि भविष्यातील गरजा
पाणी आणि पर्यावरण यांचा सहसंबंध
पावसाच्या पाण्याचे पुनरुज्जन
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर