रत्नागिरी, 20 एप्रिल, (हिं. स.) : मालवणी भाषेत प्रसिद्ध झालेली दुर्मिळ पुस्तके संग्रहासाठी पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आजगाव (ता. सावंतवाडी) येथील साहित्य प्रेरणा कट्ट्यातर्फे गेल्या ३१ मार्च रोजी शिरोडा (ता. वेंगुर्ले) येथे मालवणी भाषा संमेलन पार पडले. त्यामध्ये व्यक्त करण्यात आलेल्या विचारानुसार मालवणीत लिहिलेल्या सर्व पुस्तकांचा संग्रह करण्याचे ठरविण्यात आले आहे. ही पुस्तके शिरोडा येथील र. ग. खटखटे ग्रंथालयाला देण्यात येणार आहेत. अभ्यासासाठी तसेच लोकांना वाचण्यासाठी या संग्रहाचा उपयोग व्हावा, अशा उद्देशाने हा संग्रह करण्यात येणार आहे.
ज्यांच्याकडे मालवणी भाषेतील पुस्तके उपलब्ध असतील, ती खालील पत्त्यावर पाठवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. या पुस्तकाची किंमत आणि टपाल खर्चही दिला जाणार आहे. या पुस्तकांच्या झेरॉक्स प्रतीही तयार करण्यात येणार आहेत.
मालवणी भाषेतील पुस्तके पाठविण्यासाठी पत्ता असा : विनय वामन सौदागर, मु. पो. आजगाव, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग - 416518 (संपर्क क्रमांक - 9403088802)
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी