अफगाणिस्तानमध्ये 5.9 तीव्रतेचा भूकंप, जम्मू-काश्मीरसह उत्तर भारत हादरले
काबूल , 19 एप्रिल (हिं.स.)।अफगाणिस्तान-ताजीकिस्तान सीमावर्ती भागात शनिवारी(दि. १९) भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले.रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५.९ इतकी नोंदविण्यात आली असून, या भूकंपाचा परिणाम भारताच्या जम्मू-काश्मीरपर्यंत जाणवला. सध्या कोणतीही जी
Earthquake


काबूल , 19 एप्रिल (हिं.स.)।अफगाणिस्तान-ताजीकिस्तान सीमावर्ती भागात शनिवारी(दि. १९) भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले.रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५.९ इतकी नोंदविण्यात आली असून, या भूकंपाचा परिणाम भारताच्या जम्मू-काश्मीरपर्यंत जाणवला. सध्या कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची अधिकृत माहिती नसली, तरी स्थानिक प्रशासनाने खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत.

युरोपियन मेडिटेरेनियन सिस्मोलॉजिकल सेंटर (EMSC) नुसार, हा भूकंप शनिवार, १९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ६:४७ वाजून ५५ सेकंदांनी (UTC वेळ) झाला. भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तानच्या सीमावर्ती डोंगराळ भागात होते. भूकंपाचा केंद्रबिंदू डोंगराळ असल्याने खबरदारीची पातळी अधिक वाढविण्यात आली आहे. अफगाणिस्तानातील बदख्शान प्रांतासह अनेक भागात भूकंपाचे धक्के तीव्रतेने जाणवले.या भूकंपाचे धक्के काश्मीर आणि दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील काही भागात जाणवले.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (एनसीएस) नुसार, भूकंप भूपृष्ठाखाली ८६ किमी खोलीवर झाला. काश्मीर खोरे आणि दिल्ली-एनसीआरमध्ये सौम्य ते मध्यम भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. भूकंपाची तीव्रता जास्त नसली तरी लोकांनी घाबरून घराबाहेर धाव घेतली, आणि काही काळासाठी शहरात शांतता व सतर्कतेचे वातावरण पसरले. स्थानिक प्रशासनाने आपत्कालीन सेवा सक्रिय केल्या असून, संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

हिंदुकुश पर्वतरांगेतील टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचालींमुळे हा भूकंप घडल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. हे क्षेत्र भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानले जाते. ८६ किलोमीटर खोलीचा हा भूकंप मध्यम तीव्रतेचा असून, त्याचा परिणाम प्रमुख शहरी भागांपेक्षा दुर्गम भागांमध्ये अधिक जाणवला. तज्ज्ञांच्या मते, खोली जास्त असल्याने पृष्ठभागावरील नुकसान मर्यादित राहण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे यावेळी मोठ्या विनाशक आपत्तीची शक्यता कमी मानली जात आहे.

सद्यस्थितीत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेची नुकसान झाल्याची पुष्टी झाली नसली तरी प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन संस्था सतर्क आहेत. हवामान विभाग तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. प्रशासनाने नागरिकांना अफवांपासून दूर राहण्याचे आणि फक्त अधिकृत माहितीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे. दुर्गम भागात मदत पोहोचविण्यासाठी यंत्रणा तयार असून, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये म्हणून सर्व उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande