ओटावा , 19 एप्रिल (हिं.स.)।कॅनडात दोन गटातील गोळीबारादरम्यान एका २१ वर्षीय भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.ही विद्यार्थी बस स्टॉपवर वाट पाहत असताना ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरसिमरत रंधावा असे गोळी लागून मृत्यूमुखी पडलेल्या या विद्यार्थिनीचे नावं आहे. ती ओंटारियोमधील हॅमिल्टन येथील मोहॉक कॉलेजची विद्यार्थिनी आहे.हरसिमरत बस स्टॉपवर वाट पाहत असताना दोन वाहनातून एकमेकांवर गोळीबार झाला. या घटनेदरम्यान एक गोळी हरसिमरतला लागली. त्यात तिचा मृत्यू झाल्याचे हॅमिल्टन पोलिसांनी सांगितले. गेल्या चार महिन्यांत कॅनडामध्ये मृत्युमुखी पडलेली ती चौथी भारतीय आहे.
हॅमिल्टन पोलिसांनी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, अप्पर जेम्स आणि साउथ बेंड रोड रस्त्यांजवळ गोळीबाराची घटना घडली. रंधावा हिच्या छातीवर गोळी लागली. तिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. पण तिचा मृत्यू झाला.या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका काळ्या रंगाच्या कारमधील व्यक्ती पांढऱ्या रंगाच्या सेडानमधील व्यक्तींवर गोळीबार करताना दिसतो. या गोळीबारानंतर दोन्ही वाहने घटनास्थळावरून निघून गेली. या घटनेदरम्यान कारमधून झाडलेल्या गोळ्या जवळच्या एका घराच्या खिडकीलाही लागल्या. पण, यात कोणीही जखमी झालेले नाही.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर टोरंटोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, भारतीय विद्यार्थिनी हरसिमरत रंधावा हिच्या दुःखद मृत्यूने आम्ही खूप दुःख झालो आहोत. स्थानिक पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ती एका घटनेचा निष्पाप बळी ठरली. दोन वाहनांमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेत एक गोळी लागून तिचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास सुरू आहे. आम्ही तिच्या कुटुंबाच्या संपर्कात आहोत आणि आवश्यक ती सर्व मदत करत आहोत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode