ठाणे, 19 एप्रिल (हिं.स.)। क्लस्टर योजनेची इमारत पूर्ण होऊन रहिवासी राहण्यास गेल्याचे एकही उदाहरण पाहायला मिळत नसल्याने रहिवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अशात नियोजित क्लस्टरच्या परिसरात अधिकाऱ्यांच्या आधी बिल्डर आणि त्यांचे सहकारी घुसू लागल्याने रहिवाशांमध्ये संशय आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत ठाण्यातील १९ इमारतींच्या रहिवासी प्रतिनिधींनी आमदार संजय केळकर, क्लस्टर आणि पालिका अधिकाऱ्यांची भेट घेत संभ्रम दूर केला.
ठाणे शहरात मोडकळीस आलेल्या धोकादायक आणि अनधिकृत इमारतींचा सामूहिक विकास करण्यासाठी राज्य शासनाने क्लस्टर योजनाबाबती. त्यानुसार ठाणे शहरात ४४ आराखडे तयार करण्यात आले आहे. संजय किसननगर येथे क्लस्टरचे काम सुरू असून अन्य भागात अद्याप योजनेबाबत संभ्रम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ज्या भागात योजना राबवण्यात येणार आहे, तेथे बिल्डर आणि त्यांचे सहकारी रहिवाशांशी संपर्क साधत आहेत. खासगी व्यक्ती क्लस्टरबाबत पुढाकार घेत असल्याने अनेक भागात रहिवाशांमध्ये या योजनेबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. हा गोंधळ दूर करण्यासाठी सिद्धेश्वर तलाव, हंसनगर भागातील ४० वर्षे जुन्या १९ अनधिकृत इमारतींच्या प्रतिनिधींनी आमदार संजय केळकर यांची भेट घेतली. यावेळी बैठकीस क्लस्टर विभागाचे अधिकारी आणि ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त देखील उपस्थित होते.
याबाबत बोलताना आमदार संजय केळकर यांनी क्लस्टर विभागाच्या हलगर्जीपणाबत नाराजी व्यक्त केली. एखाद्या परिसरात क्लस्टर योजना नियोजित असेल तर त्या ठिकाणी आधी क्लस्टर आणि ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी जाऊन रहिवाशांशी संवाद साधायला हवा. योजनेचे माहिती पत्रक देऊन योजना कशा पद्धतीने राबवण्यात येईल, रहिवाशांचे हंगामी पुनर्वसन, त्यांना मिळणारी घरे, क्षेत्रफळ, सोयी-सुविधा याबाबतची माहिती त्यांनी रहिवाशांना द्यायला हवी. मात्र तसे न होता काही खासगी व्यक्ती, बिल्डर आणि त्यांचे सहकारी त्या विभागात जात असून रहिवाशांशी संपर्क साधत आहेत, त्यामुळे या योजनेबाबतची विश्वासार्हता संपत असल्याचे श्री.केळकर यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित ४० हून अधिक प्रतिनिधींना थेट क्लस्टर आणि महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करता आल्याने त्यांच्यातील गोंधळ आणि संभ्रम दूर झाला. रहिवाशांमध्ये या योजनेबाबत काही संभ्रम असेल तर त्यांनी थेट या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. या कामी क्लस्टरचे प्राधिकृत अधिकारी नेमण्यात आले असून ते याबाबत रहिवाशांना अधिकृत माहिती देतील, असेही श्री.केळकर यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर