नाशिक, 2 एप्रिल (हिं.स.) : जिल्हा परिषद नाशिकच्या पशुसंवर्धन विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून पशुवैद्यकिय सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी 'ई पशु' ॲपची निर्मित् केली असून जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते या ॲपचे अनावरण करण्यात आले. सदर ॲपचे अनावरण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. अर्जुन गुंडे, यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. बी. आर. नरवाडे, जिल्हा पुशसंवर्धन अधकारी डॉ. संजय शिंदे तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी ई पशु ॲपमुळे प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि गतीमान होणार असून पेपरलेस कामकाजामुळे वेळेची बचत होऊयन तांत्रिक कामकाज अधिक प्रभावीपणे हाताळता येणार असल्याचे सांगत पशुंच्या कल्याणासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत केली जात असल्याचे नमूद केले. तसेच जिल्ह्यातील पशुवैद्यकिय दवाखान्यांचे आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीने स्वतंत्र 'मिशन कामधेनू' योजना सुरू करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात ६० दवाखान्यांचे नूतनीकरण पूर्ण झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. अर्जुन गुंडे यांनी पशुसेवेचे महत्त्व स्पष्ट करत ई पशु ॲपमुळे ही सेवा अधिक सोपी आणि जलद होईल असे मत व्यक्त केले. सदरचे ॲप पशुवैद्यकिय संस्था प्रमुखांसाठी, पशुपालक व विभाग प्रमुखांसाठी उपयुक्त ठरणार असून जिल्ह्यातील दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवण्याबरोबरच पशुंमध्ये आजारांचे प्रमाण आणि रोगप्रसारावर वेळीच नियंत्रण ठेवता येणार आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण २४४ पशुवैद्यकिय संस्था कार्यरत असून, या ॲपच्या मदतीने त्यांच्या दैनंदीन सेवांची नोंद डिजिटल स्वरूपात ठेवली जाणार आहे. विविध प्रकारचे उपचार, औषधोपचार, लसीकरण आणि पशुरुग्ण सेवा याद्वारे अद्ययावत नोंदविली जाईल. तसेच, उपचारासाठी वापरण्यात आलेल्या औषधसाठ्याचा तपशीलही या ॲपमध्ये ठेवता येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन राजपत्रित पशुवैद्यक संघटनेचे अध्यक्ष डॉ. चांदोरे, डॉ. भगवान पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. योगेश मेहेरे आणि डॉ. ज्ञानेश्वरी भांड यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. रविंद्र चांदोरे यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI