रत्नागिरी, 20 एप्रिल, (हिं. स.) : जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाला. या प्रकाराची चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.
राजापूर तालुक्यातील आंबोळगड येथील सुविधा सुगंध वाडेकर यांना गेल्या १७ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घराशेजारी काम करत असताना सर्पदंश झाला. त्यांना श्रीपाद करगुटकर, शेजारी आणि काही ग्रामस्थांनी जवळचे रुग्णालय म्हणून जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र तेथे कोणी कर्मचारी किंवा डॉक्टर उपलब्ध नव्हते.
म्हणून त्यांना धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्या ठिकाणी किरकोळ प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना रत्नागिरीला नेण्यास सांगण्यात आले.
यामध्ये बराच कालावधी निघून गेल्याने आणि वेळेवर उपचार न झाल्याने रत्नागिरी येथे हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचाऱ्यांनी कोणता साप चावला आहे हे समजण्यासाठी साप घेऊन या, असे सांगण्यात आल्याचेही म्हटले आहे.
सर्पदंश झाल्यावर त्या महिलेवर प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेवर आणि योग्य उपचार न झाल्यामुळे त्या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला असून प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये त्या महिलेवर उपचार का झाले नाहीत याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. ग्रामपंचायत स्तरापासून ते आमदारांपर्यंत सर्वच लोकप्रतिनिधींनी ही बाब गांभीर्याने घ्यावी, अशी त्यांची मागणी आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी