ठाणे, 20 एप्रिल, (हिं.स.)। जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने, मंगळवार, २२ एप्रिल रोजी ठाणे महापालिकेच्या ‘विचारमंथन व्याख्यानमाले’त ‘अक्षय उर्जा संवर्धन' या विषयावर संशोधक शरद पुस्तके यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
हे व्याख्यान स. ११.०० वाजता ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे होणार आहे. ते सगळ्यांसाठी खुले आहे. व्याख्यानमालेतील हे पंधरावे पुष्प आहे.
राज्यभरात, २२ एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिन आणि ०१ मे हा महाराष्ट्र दिन यांचे औचित्य साधून या काळात वसुंधरा संवर्धनाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. 'आमचा ग्रह, आमची पृथ्वी' ही यंदाच्या वर्षीची संकल्पना आहे. त्या अनुषंगाने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
*वक्ते - शरद पुस्तके*
अक्षय ऊर्जा संवर्धन विषयातील तज्ज्ञ असलेले शरद पुस्तके हे फाउंडेशन फॉर इंटर डिसिप्लिनरी रिसर्च संस्थेचे संस्थापक विश्वस्त आणि अध्यक्ष आहेत. स्वच्छ व्यवस्थापन विकास प्रकल्पाचे ते सल्लागार आहेत.
*विचारमंथन व्याख्यानमाला*
ठाणे महापालिकेच्या वतीने महनीय व्यक्तींच्या जयंती तसेच पुण्यतिथीला त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले जाते. तसेच विविध दिनांच्या निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचबरोबरीने, ज्या महनीय व्यक्तींचे स्मरण केले जाते, त्यांचे कार्य व माहिती कळावी, त्यांच्या विचारांचा जागर व्हावा यासाठी ‘विचारमंथन व्याख्यानमाले’त मान्यवर व्यक्तींचे व्याख्यान आयोजित केले जाते. या व्याख्यानमालेतील हे सोळावे पुष्प असून ठाणेकरांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर