अमरावती, 21 एप्रिल (हिं.स.)।
भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा मंडळाच्या अध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली. त्यामध्ये संत गाडगेबाबा मंडळाचे अध्यक्ष अभिजित वानखडे, कॉटन मार्केट मंडळ सचिन नाईक, विद्यापीठ मंडळ प्रफुल्ल बोके, स्वामी विवेकानंद मंडळ संतोष कावरे, अंबा मंडळ मनीष चौबे, साई मंडळ भारती गुहे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. बडनेरा मंडळाच्या अध्यक्षाचे नाव स्थगित ठेवण्यात आले.भारतीय जनता पार्टीच्या अमरावती शहर जिल्ह्याच्या संघटन पर्व अभियानानुसार मंडळ अध्यक्ष निवडणुकीच्या संदर्भात भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालय मुंबई येथे महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रदेश महामंत्री रणधीर सावरकर, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, आमदार विक्रांत पाटील, प्रदेश महामंत्री माधवी नाईक, प्रदेश महामंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, विदर्भसंघटन मंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते. बैठकीत ठरल्याप्रमाणे २० एप्रिल २०२५ रोजी नवनिर्वाचित मंडळ अध्यक्षांची घोषणा करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या तयारीची मजबूत पायाभरणी भाजपच्या वतीने करण्यात आली. भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एका संघटित कार्यपद्धतीची ही सुरुवात असल्याचे मानण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी