सिंधुदुर्ग, 21 एप्रिल (हिं.स.)। गेली दहा वर्षे शांतता आणि प्रगतीकडे झेपावणारा जिल्हा अशी सिंधुदुर्गची ओळख होती. पण एकाच घरात सत्ता गेल्यानंतर सिंधुदुर्गात गुंडगिरी सुरू झाली आहे. खून, हाणामाऱ्या वाढत चालल्या असून सिंधुदुर्ग जिल्हयाची वाटचा बीड जिल्ह्याप्रमाणे होऊ लागली आहे असा आरोप माजी खासदार विनायक राऊत यांनी आज कणकवलीत केला. तसेच बिडवलकर आणि सावडाव हाणमारी प्रकरणाचा सखोल तपास व्हावा अशी मागणी आपण जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली असल्याचे ते म्हणाले.
कणकवली येथील विजयभवन येथे श्री.राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासोबत माजी आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, सुशांत नाईक, महिला आघाडी संघटक मधुरा पालव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
श्री.राऊत म्हणाले, सन २०१४ पूर्वी खून, मारामाऱ्या, ठेकेदार भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांना केली जाणारी मारहाण यामुळे सिंधुदुर्ग बदनाम झाला होता. अनेक खून होऊन देखील ते पचवले जात होते. गुन्हेगारांना राजाश्रय मिळत होते. सन २०१४ पूर्वी सर्वाधिक संवेदनशील मतदान केंद्रे असलेला जिल्हा अशीही सिंधुदुर्गची ओळख होती. हे सर्व पाप नारायण राणे आणि त्यांच्या गुंडगिरी करणााऱ्या बदमाश लोकाचं होते.
श्री. राऊत म्हणाले, सन २०१४ मध्ये मी लोकसभा मतदारसंघात निवडून आलो. त्या पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत कुडाळमधून वैभव नाईक, सावंतवाडीतून दीपक केसरकर निवडून आले. त्यानंतर २०२४ या दहा वर्षात सिंधुदुर्ग हा सुसंसकृत, शांततप्रिय, राजकीय हत्या न करणारा, प्रगतीकडे झेपावणारा जिल्हा अशी सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्रतिमा निर्माण झाली. पर्यटक मोठ्या प्रमाणात येत होते. शेती बागायतीमध्ये उत्पादकता वाढली होती. पण सन २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नारायण राणे कुटुंबियांच्या हाती सत्ता आली. त्यानंतर पुन्हा सिंधुदुर्ग जिल्हा हा दारू, ड्रग्ज, गुडगिरी, खून करणाऱ्यांचा जिल्हा अशी ओळख निर्माण होऊ लागला आहे. तशा घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घडवून आणलेल्या आहेत.
श्री. राऊत पुढे म्हणाले, वैभव नाईक यांनी दहशतीविरोधात चांगला आवाज उठवला आहे. बिडवलकर हत्या प्रकरण, सावडाव येथे पती-पत्नीला क्रूरपणे झालेली मारहाण, त्या विरोधात आम्ही आवाज उठवत आहोत. राणेंच्या गुंडांनी यापुढेही असे प्रकार सुरू ठेवले तर आम्ही गप्प बसणार नाही. सातत्याने त्या विरोधात आवाज उठवणार आहोत.
कुडाळमधील चाेरटी दारू वाहतूक करणारा एक आरोपी आपला व्हिडिओ बनवतो आणि प्रशासनाला आव्हान देतो. हे राजकीय पाठबळ असल्याशिवाय शक्य नाही. त्यामुळे मागील पाच वर्षातील सर्व व्हीडिओ पोलिसांनी तपासावेत. दारू आणि ड्रग्स पुरवठा यामध्ये त्याचा किती सहभाग आहे. या सर्वांचा पाेलिसांनी शोध घ्यावा. खरं तर दोन वर्षापूर्वी आरोपी शिरसाट याच्या तडीपारीचा प्रस्ताव प्रातांनी तयार केला आहे. त्याची अंमलबजावणी व्हावी. दहशत माजवणाऱ्या गुंडावर पायबंद घालण्याचे काम जसे पोलीस प्रशासनाचे तसंच जिल्हा प्रशासनाचे ही आहे.
राऊत म्हणाले, सन २०१४ पूर्वी बीड पेक्षा सिंधुदुर्ग जिल्हा हा हत्याकांडांचा पोशिंदा जिल्हा झाला होता. आता २०२४ नंतर सिंधुदुर्गची वाटचाल पुन्हा बीडच्या दिशेने सुरू राहिलेली आहे. एकाच घरात सत्ता गेल्याने पुन्हा गुंडगिरी वाढू लागली आहे. लवकरच गद्दार गटाचे उपमुख्यमंत्री सिंधुदुर्गात येणार आहेत. येथे आल्यावर त्यांनी आपले कार्यकर्ते किती विकृतीचे आहेत ते पहावे. उदय सामंत यांनीही या विकृतीबाबत लक्ष घालायला हवे. जर तुम्ही या विकृतीला पोसत असाल तर येथील प्रामाणिक कार्यकर्ता, सिंधुदुर्ग जिल्हा वाचविण्यासाठी निश्चितपणे पुढे येईल.
राऊत म्हणाले, बिडवलकर हत्येचा तपास करत असताना, त्या घटनेचे गांभिर्य पोलिसांनी लक्षात घ्यावे. बिडवलकर याचे केलेले हाल तुमच्यापर्यंत आलेले आहेत. त्यामुळे आरोपीला फासावर लटकविण्याच्या दृष्टीने तपास करा. त्याचप्रमाणे सावडाव मधील पाचही आरोपींवर कारवाई करा. कारण यातील दोन्ही आरोपींकडे विनापरवाना बंदूका आहेत. वैभव सावंत आणि त्यांच्या पत्नी यांची हत्या ते करू शकतात अशी भीती असल्याचेही श्री. राऊत यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / निलेश जोशी