रत्नागिरी, 24 एप्रिल, (हिं. स.) : आंबतखोल (ता. चिपळूण) येथील जंगलात एका कात कंपनीच्या पत्राशेडमध्ये लपवून ठेवलेला गोवा बनावटीचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडला आहे. या मद्याची किंमत २१ लाख ६६6 हजार रुपये आहे.
बेवारस स्थितीत सापडलेल्या या मद्यसाठ्याचा मालक कोण, याचा शोध घेतला जात आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी होते. या पार्श्वभूमीवर गोवा बनावटीच्या मद्यावर भरारी पथकाचे निरीक्षक अमित पाडळकर आणि त्यांचे सहकारी अधिकारी, जवान गोवा बनावटीच्या मद्यसाठ्यावर लक्ष ठेवून आहेत. आंबतखोल येथील जंगलातील कुलूपबंद शेडमध्ये गोवा मद्याचेखोके लपवून ठेवले असल्याची माहिती मिळाली.
या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्याशी भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा करून छापा मारण्याचे नियोजन केले. त्यानुसार निरीक्षक पाडळकर यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक गणेश जाधव, सचिन यादव, जवान मानस पवार, वैभव सोनावले, मलिक धोत्रे यांनी छापा मारला. जंगल भागात सुखकर्ता कात उद्योग कंपनीच्या पत्राच्या शेडमध्ये तपासणी केली असता गोवा बनावटीच्या मद्याचे तब्बल ३०० खोके सापडले. या मद्याची किंमत २१ लाख ६६ हजार रुपये असून हा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी