इस्त्रोचे माजी प्रमुख डॉ. कस्तुरीरंगन कालवश
नवी दिल्ली, 25 एप्रिल (हिं.स.) : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी प्रमुख डॉ. कस्तुरीरंगन यांचे आज, शुक्रवारी बंगळुरू येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनावर देशाच्या राष्ट्रपती द्रौपद
के. कस्तुरीरंगन


नवी दिल्ली, 25 एप्रिल (हिं.स.) : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी प्रमुख डॉ. कस्तुरीरंगन यांचे आज, शुक्रवारी बंगळुरू येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनावर देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी शोक व्यक्त केला.

यासंदर्भात महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, डॉ. कृष्णस्वामी कस्तुरीरंगन आता या जगात नसल्याचे ऐकून दुःख झाले. इस्रोचे प्रमुख म्हणून त्यांनी भारताच्या अंतराळ कार्यक्रमाच्या उत्क्रांतीत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी विविध क्षेत्रात मोठे योगदान दिले, राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करण्यास मदत केली. त्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करते असे राष्ट्रपतींनी आपल्या शोकसंदेशात नमूद केले आहे. तर पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताच्या वैज्ञानिक आणि शैक्षणिक प्रवासातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या निधनाने खूप दुःख झाले आहे. त्यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि राष्ट्रासाठी निस्वार्थी योगदान नेहमीच लक्षात ठेवले जाईल. त्यांनी इस्रोची सेवा मोठ्या परिश्रमाने केली, भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला नवीन उंचीवर नेले, ज्यासाठी आम्हाला जागतिक मान्यता देखील मिळाली. त्यांच्या नेतृत्वात महत्त्वाकांक्षी उपग्रह प्रक्षेपण देखील झाले आणि नवोपक्रमावर लक्ष केंद्रित केल्याचे पंतप्रधानांनी त्यांच्या शोकसंदेशात म्हंटले आहे. तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, इस्रोला बळकटी देण्यात आणि महत्त्वाच्या अंतराळ मोहिमांमध्ये काम करणारे डॉ. के. कस्तुरीरंगन यांचे निधन हे वैज्ञानिक समुदायाचे आणि देशाचे मोठे नुकसान आहे. पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित असलेले के. कस्तुरीरंगन यांनी भारताच्या अंतराळ संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि महत्त्वाच्या धोरणनिर्मितीत विविध पदांवर काम केले. आमच्या भावना आणि प्रार्थना त्यांच्या कुटुंबासोबत, सहकाऱ्यांसोबत असल्याचे त्यांनी आपल्या शोकसंदेशात नमूद केले आहे.

--------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande