‘नई सोच नई कहानी - अ रेडिओ जर्नी विथ स्मृती इराणी’ ही या वर्षातील सर्वोत्तम मालिका ठरली
‘पब्लिक स्पीक’ ने पटकावला आरोग्य आणि तंदुरुस्ती श्रेणीतील सर्वोत्तम ऑडिओ स्ट्रीमिंग कार्यक्रमाचा पुरस्कार
मुंबई, २६ एप्रिल (हिं.स.) : इंडिया ऑडिओ समिट अँड अवॉर्ड्स, आयएएसए 2025 मध्ये आकाशवाणीने विविध श्रेणींमध्ये एकूण सहा पुरस्कार पटकावले आहेत . रेडिओ आणि ऑडिओ कंटेंट निर्मितीतील उत्कृष्टतेला गौरवणाऱ्या या पुरस्कारांची तिसरी आवृत्ती 25 एप्रिल रोजी मुंबईत आयोजित करण्यात आली होती.
इंडिया ऑडिओ समिट अँड अवॉर्ड्स 2025 मध्ये आकाशवाणीच्या महासंचालक डॉ. प्रज्ञा पालीवाल गौर सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होत्या. उपस्थितांना संबोधित करताना डॉ. गौर यांनी श्राव्य उद्योगातील क्रांती आणि भारताची सार्वजनिक सेवा प्रसारक म्हणून देशातील लोकांना 'माहिती देणे, शिक्षित करणे आणि मनोरंजन करणे' या ध्येयाप्रति आकाशवाणीची वचनबद्धता अधोरेखित केली. विश्वासार्हतेसाठी आकाशवाणीकडे पाहिले जाते आणि कोलाहलाच्या जगात ती दीपस्तंभ म्हणून काम करते यावर त्यांनी भर दिला.
सर्वोच्च पुरस्कारांमध्ये, 'नई सोच नई कहानी - अ रेडिओ जर्नी विथ स्मृती इराणी' या माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमाला रेडिओवरील 'सीरीज ऑफ द इयर' म्हणून गौरवण्यात आले. 13 भागांच्या या मालिकेत प्रामुख्याने महिलांची जिद्द आणि दृढनिर्धाराच्या विलक्षण कथांचा उत्सव साजरा करण्यात आला. या मालिकेचा समारोप गेल्या वर्षी राष्ट्रपती भवनात ध्वनिमुद्रित केलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या विशेष मुलाखतीने झाला होता.
वृत्तसेवा विभागाचा लोकप्रिय साप्ताहिक कार्यक्रम पब्लिक स्पीक या फोन-इन शोला आरोग्य आणि तंदुरुस्ती श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट ऑडिओ स्ट्रीमिंग निर्मिती म्हणून गौरवण्यात आले. इतर पुरस्कार विजेत्या कार्यक्रमांमध्ये छायागीत ने सर्वोत्कृष्ट लेट नाईट शो श्रेणीतील पुरस्कार ; उजाले उनकी यादों के सर्वोत्कृष्ट सेलिब्रिटी शो ऑन एअर आणि सफरकास्ट ने सर्वोत्कृष्ट पर्यटन कार्यक्रमाचा पुरस्कार पटकावला. लघु-स्वरूपातील ऑडिओ कन्टेन्ट मधील सर्जनशील उत्कृष्टतेसाठी आकाशवाणीने सर्वोत्कृष्ट इंटरस्टिशियलचा पुरस्कार देखील पटकावला.
इंडिया ऑडिओ समिट अँड अवॉर्ड्सबद्दल
इंडिया ऑडिओ समिट अँड अवॉर्ड्स हा भारतातील चैतन्यशील परिदृश्यातील उल्लेखनीय ऑडिओ उत्कृष्टतेचा गौरव करण्यासाठी समर्पित एक अग्रगण्य उपक्रम आहे. हे व्यासपीठ ऑडिओबुक्स पासून ते पॉडकास्ट, रेडिओ, ऑडिओ जाहिराती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत विविध प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित सर्वात आकर्षक आणि अभूतपूर्व ऑडिओ कंटेंटचा शोध घेते आणि त्याला गौरवते. हा उपक्रम एका कठोर मूल्यांकन प्रक्रियेचे प्रतीक आहे, जो पथदर्शी कामगिरीची दखल घेण्यासाठी एक न्याय्य आणि निष्पक्ष मंच सुनिश्चित करतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी