
नवी दिल्ली, 10 मार्च (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 11 मार्च 2026 रोजी केरळ आणि तामिळनाडूचा दौरा करणार असून या दौऱ्यात ते हजारो कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण करणार आहेत. दुपारी सुमारे 1.30 वाजता ते एर्नाकुलम येथे पोहोचून सुमारे 10,800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना चालना देतील. कार्यक्रमादरम्यान ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.
एर्नाकुलम येथे पंतप्रधान भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) च्या कोची रिफायनरीमध्ये सुमारे 5,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत उभारल्या जाणाऱ्या पॉलीप्रोपिलीन युनिटची पायाभरणी करतील. दरवर्षी 400 किलो टन क्षमतेच्या या प्रकल्पामुळे देशातील पॉलिमर उत्पादन क्षमता वाढणार असून आयात अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. तसेच उद्योगांना चालना मिळून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
याच कार्यक्रमात राष्ट्रीय महामार्ग-66 वरील थलापडी–चेंगळा सहा पदरी महामार्ग प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. सुमारे 2,650 कोटी रुपयांच्या खर्चातून उभारलेला हा मार्ग मुंबई–कन्याकुमारी आर्थिक कॉरिडॉरचा महत्त्वाचा भाग असून कासारगोड, कन्नूर आणि मंगळुरू परिसरातील संपर्क अधिक मजबूत होणार आहे. तसेच कोझिकोड बायपासच्या वेंगलम ते रामनट्टुकरा सहा पदरीकरण प्रकल्पाचेही उद्घाटन होणार आहे. या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात घटण्याची अपेक्षा आहे.
याशिवाय प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत उभारलेल्या 23 ग्रामीण रस्त्यांचे उद्घाटन, अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत पुनर्विकसित शोरनूर जंक्शन, कुट्टीपुरम आणि चंगणसेरी रेल्वे स्थानकांचे उद्घाटन तसेच शोरनूर–निलंबूर रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरण प्रकल्पाचे राष्ट्रार्पणही पंतप्रधान करणार आहेत. पलक्कड–पोल्लाची दरम्यान नवीन रेल्वे सेवेलाही ते हिरवा झेंडा दाखवतील. तसेच कोल्लम जिल्ह्यातील पश्चिम कल्लाडा येथे 50 मेगावॅट क्षमतेच्या तरंगत्या सौर प्रकल्पाची पायाभरणीही केली जाणार आहे.
यानंतर सायंकाळी 5.45 वाजता पंतप्रधान तिरुचिरापल्ली येथे सुमारे 5,650 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. यात पेट्रोलियम व नैसर्गिक वायू पायाभूत सुविधा, महामार्ग विकास, ग्रामीण रस्ते आणि रेल्वे सेवांचा समावेश आहे. या दौऱ्यात ते नीलगिरी आणि इरोड जिल्ह्यांमध्ये शहर गॅस वितरण प्रकल्पाची पायाभरणी करतील, ज्यामुळे लाखो घरांना पीएनजी कनेक्शन उपलब्ध होणार आहे. तसेच दोन अमृत भारत एक्सप्रेससह अनेक रेल्वे सेवांना हिरवा झेंडा दाखवून दक्षिण भारतातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule