अहिल्यानगर, 26 एप्रिल (हिं.स.)।
निमगाव वाघा (तालुका नगर) येथील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त कुस्तीचे मैदान लाल मातीच्या आखा ड्यातील थरारक कुस्त्यांनी रंगले होते. हलगी-डफाचा निनाद, बजरंग बलीचा जयघोष, आखाड्या भोवती जमलेल्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात युवा मल्लांच्या कुस्त्या पार पडल्या.
मैदानात झालेल्या चितपट कुस्त्यांनी ग्रामस्थांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. उपसरपंच केसरी या मानाच्या तीन कुस्त्या लावण्यात आल्या. यामध्ये पै. संदिप डोंगरे, पै. महेश शेळके व पै. सौरभ शिंदे यांनी चितपट कुस्त्या करुन चांदी च्या गदा व रोख रकमेचे बक्षीस पटकाविले. मल्लांच्या डाव-प्रतिडावाने आखाडा रंगला होता.
उपसरपंच किरण जाधव यांच्या वतीने मानाच्या तीन रंगतदार कुस्त्या लावण्यात आल्या होत्या. यामध्ये पै. संदिप डोंगरे (निमगाव वाघा) विरुध्द पै. अक्षय वाडितके (लोणी बुद्रुक) यांच्यात झालेल्या कुस्तीत संदिप डोंगरे याने एकेरी पट काढून समोरच्या मल्लास आसमान दाखवून विजय संपादन केले.पै. महेश शेळके (निमगाव वाघा) विरुध्द पै. राहुल काकडे यांच्यातील कुस्तीत पै. महेश शेळके याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन पाच ते सात मिनीटात प्रतिस्पर्धी मल्लाला चितपट केले. तर पै. अभिषेक मळेकर (अमरावती) विरुध्द पै. सौरभ शिंदे (पिंपळगाव वाघा) यांच्यात झालेल्या कुस्तीत सौरभ शिंदे मानेवर कस काढून कुस्ती अवघ्या मिनीटात चितपट केली. या तिन्ही विजयी मल्लांना चांदीची गदा व रोख रकमेचे बक्षीस देण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील अनेक युवा व दिग्गज मल्लांसह महिला कुस्तीपटूंनी हजेरी लावली होती. रंगलेल्या कुस्त्यांमध्ये विजयी व उपविजयी मल्लांना बक्षीसे देण्यात आली. आकाश डोंगरे याची कुस्ती प्रेक्षणीय ठरली. महाराष्ट्र चॅम्पीयन पै. अनिल ब्राम्हणे यांनी देखील आखाड्यात हजेरी लावली होती. कुस्ती क्षेत्रातील वस्ताद मंडळींचा ग्रामस्थांच्या वतीने रोख रकम देवून सन्मान करण्यात आला.
गावातील यात्रेनिमित्त युवकांनी कावडीने आणलेल्या गंगाजलची गावात पारंपारिक वाद्याच्या गजरात मिरवणुक पार पडली. या मिरवणुकीत संगीताच्या तालावर नृत्य करणारे अश्व मिरवणुकीचे आकर्षण ठरले. सुरेश जाधव यांनी शिवकालीन युध्दकलेचे धाडसी प्रात्यक्षिक दाखवले. श्रीबिरोबा महाराजांच्या मूर्तीस गंगाजलाने अभिषेक घालून विधीवत पूजा करण्यात आली. यात्रोत्सवानिमित्त मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. रात्री छबीना मिरवणूक पार पडून नर्गिस पुणेकर यांचा आर्केस्ट्राचा कार्यक्रम रंगला होता.दुसऱ्या दिवशी संध्याकाळी करिम शहा वली बाबांचा संदल-उरुस उत्साहात पार पडला. निघालेल्या मिरवणुकीत गावात धार्मिक एकतेचे दर्शन घडले. करिमशहा वली बाबांच्या दर्ग्यात दर्शनासाठी देखील भाविकांनी गर्दी केली होती.
हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni