नवी दिल्ली, 26 एप्रिल (हिं.स.) : अहिंसा हा भारताचा स्थायीभाव आणि जनतेचा स्वभाव आहे. परंतु, अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा करणे हे राजाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. ते द हिंदू मॅनिफेस्टो पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते.
पहलगाममधील हिंदूंच्या टार्गेट किलींगमुळे संपूर्ण देश संतप्त आहे. पाकिस्तानला धडा शिकवले पाहिजे असे जनमत आहे. यापार्श्वभूमीवर मोहन भागवत म्हणाले की, भारत कधीही आपल्या शेजारी देशाचे नुकसान करत नाही परंतु जर कोणताही देश किंवा गट चुकीचा मार्ग स्वीकारतो आणि अत्याचार करतो तर राजाचे कर्तव्य आहे की ते आपल्या लोकांचे रक्षण केले पाहिजे. रावणाच्या वधाचे उदाहरण देताना सरसंघचालक म्हणाले की, देवाने रावणाला मारले आणि तो हिंसाचार नव्हता. अत्याचार करणाऱ्यांना रोखणे हे आपले कर्तव्य आहे. प्रजेचे रक्षण करणे आणि गुन्हेगारांना शिक्षा करणे हे राजाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. जेव्हा कोणी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडतो आणि सुधारणेचा कोणताही मार्ग उरत नाही, तेव्हा त्याला मारणे ही एक प्रकारची अहिंसा आणि धर्माचे पालन आहे. मोहन भागवत यांनी त्यांच्या संपूर्ण भाषणात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला नाही परंतु असे मानले जाते की त्यांनी हे विधान पहलगाममध्ये झालेल्या हिंदूंच्या टार्गेट किलींगच्या पार्श्वभूमीवर केले. तसेच त्यांनी भाषणात पाकिस्तानचा उल्लेख केलेला नसला तरी असे मानले जाते की त्यांच्या बोलण्याचा रोख पाकिस्तानकडे होता.
------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी