* राष्ट्रीय रोजगार मेळाव्या अंतर्गत 79 उमेदवारांना नियुक्ती पत्राचे वितरण
नागपूर, २६ एप्रिल (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आयोजित करण्यात येणारा राष्ट्रीय रोजगार मेळावा हा नोकरी प्रदान करण्यासोबतच राष्ट्रनिर्माण करणारा मेळावा असून देशातील तरुणांना सरकारी विभागात नोकरी प्रदान करून जनतेला सर्व सेवासुविधा वेळेवर देण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध आहे.
राष्ट्रीय रोजगार मेळाव्यातून नियुक्त झालेले उमेदवार हे प्रामाणिकता, कर्मठता, कार्यतत्परता ही मूल्ये जपून सेवा प्रदान करतील आणि त्यांना मिळालेली ही संधी ते एक जबाबदारी म्हणून स्वीकारतील असे प्रतिपादन नागपूर आयकर विभागाच्या प्रधान मुख्य आयुक्त डॉ. हर्षवर्धिनी बुटी यांनी राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात केले.नागपूरच्या छिंदवाडा रोड स्थित राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी एनएडीटी येथे 79 नवनियुक्तांना नियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.
देशात एकाच वेळी 47 ठिकाणी 51,000 पेक्षा जास्त उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे विविध सरकारी विभागाचे नियुक्तीपत्र वितरित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्याचे थेट प्रक्षेपण याप्रसंगी दाखवण्यात आले . नागपूर येथे आयोजित रोजगार मेळाव्यामध्ये 79 उमेदवारांना विविध सरकारी विभागाचे नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यामध्ये आयकर विभागात 16 उमेदवार , मिनरल एक्सप्रेशन लिमिटेड येथे 11,दक्षिण पूर्व मध्ये रेल्वे विभाग) 14 , सेंट्रल रेल्वे मध्ये 5 ,ईपीएफओ 7 ,राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय 4, सेंट्रल वॉटर कमिशन-1, डिपार्टमेंट ऑफ पोस्ट-4, बँक ऑफ बडोदा-7, फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया 2, इएसआयसी 7 आणि डिपार्टमेंट ऑफ वॉटर सर्वे या कार्यालयामधील एक अशा एकूण 79 उमेदवारांचा समावेश आहे. राष्ट्रीय रोजगार मेळाव्याचे हे महाराष्ट्र राज्यातील 15 वे संस्करण असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
22 ऑक्टोबर 2022 पासून पंतप्रधान नरेंद मोदींच्या हस्ते राष्ट्रीय रोजगार मेळाव्याची सुरुवात झाली असून केंद्रातील आणि राज्यातील एकूण 38 पेक्षा जास्त विभागात 9 लाखांपेक्षा अधिक ग्रुप बी आणि ग्रुप सी यांची मिशन मोड अंतर्गत नियुक्ती करण्यात आली आहे .
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी