रत्नागिरी, 26 एप्रिल, (हिं. स.) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर येथील शास्त्री पुलाजवळ आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मोठी दरड कोसळली. या दुर्घटनेत एक महिला किरकोळ जखमी झाली असून, एका रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भातील माहितीनुसार आज सकाळी नेहमीप्रमाणे वाहतूक सुरू असताना अचानक शास्त्री पुलाच्या बाजूच्या डोंगरावरून मोठी दरड कोसळली. या दरडीचा काही भाग रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेवर कोसळला. त्यामुळे ती किरकोळ जखमी झाली. तसेच पुलाजवळ उभ्या असलेल्या एका रिक्षावर दरड कोसळल्याने रिक्षाचा दर्शनी भाग पूर्णपणे चक्काचूर होऊन गेला आहे. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळित झाली होती. घटनेनंतर स्थानिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.या धोकादायक भागातील दरड हटवण्याबाबत त्यांनी यापूर्वी संबंधित ठेकेदाराला अनेकवेळा निवेदन दिले होते. मात्र ठेकेदाराने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज ही दुर्दैवी घटना घडली आहे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे महिलेला दुखापत झाली आणि रिक्षाचे मोठे नुकसान झाले, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी