हिंगोली, 27 एप्रिल (हिं.स.)।
शासनाने शासन निर्णय निर्गमित करुन 28 एप्रिल हा दिवस 'सेवा हक्क दिन' म्हणून साजरा करण्यास मान्यता दिलेली आहे. 28 एप्रील रोजी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 च्या अंमलबजावणीस दहा वर्ष पूर्ण होत असल्याने या दशकपूर्तीचे औचित्य साधून जिल्हास्तरावर तसेच ग्रामपातळीवर ग्रामपंचायत स्तरावर विशेष उपक्रम राबविण्याबाबत सूचित केलेले आहे.
या पार्श्वभूमीवर उद्या 28 एप्रील रोजी हिंगोली जिल्ह्यामध्ये 'सेवा हक्क दिव' तसेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 च्या दशकपूर्तीचे औचित्य साधून सर्व कार्यालयामध्ये तसेच ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालय,आपले सरकार केंद्र या ठिकाणी विविध उपक्रम राबवून हा दिवस जनसहभागासह साजरा करावा व नागरिकांमध्ये या अधिनियमाबाबत तसेच आपले सरकार पोर्टल व्दारे उपलब्ध असलेल्या सेवाबाबत जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करावेत.
28 एप्रील रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे सभागृहामध्ये सकाळी 11 वाजता 'सेवा हक्क दिन'निमित्त उक्त कायद्याच्या ठळक तरतुदीचे वाचन करुन सेवेची बांधिलकी मानणारी शपथ घेण्यात येणार आहे. तसेच ज्या विभागांनी, कार्यालयांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 अधिनियमान्वये अधिसूचित केलेल्या सेवा 100 टक्के ऑनलाईन दिलेल्या कार्यालय, विभागप्रमुखांना प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट काम करणा-या अधिका-यांचा गौरव करण्यात येणार आहे.
या समारंभास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, स्वंयसेवी संस्था, नागरिक, पत्रकार यांनी उपस्थित राहुन सेवा हक्क दिनांचा कार्यक्रम साजरा करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड यांनी केले आहे.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने