नवी दिल्ली, 28 एप्रिल (हिं.स.) : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या हिंदू पर्यटकांच्या नरसंहारानंतर भारत सरकारने पाकिस्तानला आणखी एक दणका दिला आहे. भारताने पाकिस्तानच्या 16 युट्युब चॅनेल्सवर बंदी घातली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने पाकिस्तानच्या प्रतिबंधीत युट्यूब चॅनल्सची यादी जारी केली आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या यादीनुसार डॉन न्यूज , सामा टीव्ही, एआरवाय न्यूज , जिओ न्यूज यासह अन्य चॅनेल्सवर ही बंदी लागू करण्यात आली आहे. यामध्ये माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या यूट्यूब चॅनेलचा देखील समावेश आहे. या चॅनेल्सकडून भारत, भारतीय सैन्य आणि सुरक्षा यंत्रणांविरुद्ध भडकाऊ, धार्मिक तेढ वाढवणारी, खोटी व दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात होती. देशाच्या सुरक्षिततेला धोका पोहोचवणाऱ्या या प्रकारांवर लगाम घालण्यासाठी ही कठोर कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भारतीय सरकारने स्पष्ट केले आहे की, देशाच्या सार्वभौमत्वाशी आणि सामाजिक सलोख्याशी खेळणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या डिजिटल प्रचाराला मुळापासून थांबवले जाईल. या कारवाईनंतर अधिकृत यंत्रणांकडून पुढील पावले आणि तपासाच्या प्रक्रियेची माहिती लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयांने सांगितले.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode