प्रसिद्ध रंगभूषा संकल्पक विक्रम गायकवाड यांचे निधन
मुंबई, १० मे (हिं.स.) : राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध रंगभूषा संकल्पक (मेकअप आर्टिस्ट) विक्रम गायकवाड यांचे मुंबईत निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योत्स्ना आणि मुलगी तन्वी आहे. विक्रम गायकवाड गेल्या काही दिवसांपासून
विक्रम गायकवाड


मुंबई, १० मे (हिं.स.) : राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध रंगभूषा संकल्पक (मेकअप आर्टिस्ट) विक्रम गायकवाड यांचे मुंबईत निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योत्स्ना आणि मुलगी तन्वी आहे.

विक्रम गायकवाड गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. कोरोनामध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. तेव्हापासून ते आजारी होते. मात्र गेल्या ८ दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती. त्यामुळे त्यांना हिरानंदानी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र आज, शनिवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनावर मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. आज, शनिवारी दुपारनंतर दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळत आहे.

विक्रम गायकवाड यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरील सरदार या सिनेमातून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले होते. त्यांनी काशीनाथ घाणेकर, बालगंधर्व, ठग्ज ऑफ हिंदुस्तान, शहीद भगतसिंग ते जाणता राजापर्यंत वैविध्यपूर्ण पात्रांना गायकवाड यांनी आपल्या रंगभूषेने अधिक वास्तववादी केले. याशिवाय मेकिंग ऑफ महात्मा, बालगंधर्व, संजू, ८३, पानिपत, बेल बॉटम ,उरी, डर्टी ब्लॅकमेल, दंगल, पीके, झांशी, सुपर 30, केदारनाथ या चित्रपटांत देखील अनेक पात्र जिवंत केली होती. सोबतच छत्रपती शिवाजी महाराज या ऐतिहासिक मालिकेत देखील प्रसिद्ध रंगभूषाकार म्हणून जबाबदारी पार पडली होती. पावनखिंड, फत्ते शिकस्त, शेर शिवराज अशा ऐतिहासिक मालिकांमध्ये देखील त्यांनी रंगभूषाकार म्हणून उत्तम जबाबदारी निभावली होती. त्यांना सात वेळा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. तर २०१३ मध्ये बंगाली सिनेमासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

अभिनेते अशोक शिंदे यांचे वडील बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनात विक्रम गायकवाड यांनी मेकअपची कला आत्मसात केली. आधी शाळेच्या मुलांना स्नेहसंमेलनासाठी मेकअप करण्याचे काम करत विक्रम गायकवाड यांनी मेकअपच्या कामाचा सराव केला. स्वतः सातवीत शिकत असताना विक्रम गायकवाड यांनी शाळांतील मुलांना चिमणी, गाढव, मोर, पोपट असा मेकअप करुन दिला होता. पुण्यातल्या सगळ्या मुलींच्या शाळेत मेकअपसाठी गेल्याचे विक्रम गायकवाड यांनी सांगितले होते. त्यानंतर एकांकिका, लोकनृत्य, संगीत नाटक स्पर्धांसाठी त्यांनी मेकअप करायला सुरुवात केली होती. दहावीत असताना सगळ्या संगीत नाटकातील दिग्गज कलाकारांचे मेकअप त्यांनी केले होते. आपल्यासमोर कोणी व्यक्ती नाही तर साक्षात देव आहे आणि त्याची पूजा आपण करत आहोत, या भावनेतून मेकअप केल्याचे विक्रम गायकवाड म्हणाले होते.

विक्रम गायकवाड यांच्या चित्रपटांमधील मेकअप करिअरची सुरुवात सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरील 'सरदार' या चित्रपटातून झाली होती. या चित्रपटासाठी त्यांनी परेश रावलचा सरदार वल्लभभाई पटेल ही भूमिका साकारण्यासाठी मेकअप केला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande