अकोला, 12 मे (हिं.स.)।, ‘डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेमुळे मुस्लिमांचे अस्तित्व भारतात टिकून राहील आणि हा देश आमचा आहे, हे आम्हाला हक्काने सांगता येतं, असे मत आमदार साजिदखान पठाण यांनी व्यक्त केले. बाबासाहेब आंबेडकरांच्या तंतोतंत उद्देशांचा पालन प्रतिष्ठान करत असल्याचे कौतुकही त्यांनी याप्रसंगी केले. मुस्लिम समुदायासाठी हे प्रतिष्ठान एक आदर्श आहे ’, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
खडकी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे बुद्ध पौर्णिमेचे आैचित्य साधत बुद्धजयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बाेलत हाेते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार साजिदखान पठाण, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, प्रा. विश्वनाथ कांबळे, प्रा. गणेश बोरकर उपस्थित होते.
शैक्षणिक आणि आर्थिक विकास करावयाचा असल्यास एकसंघ राहणे गरजेचे आहे. बौद्ध धम्माचे प्रचारक म्हणून प्रतिष्ठान भविष्यात काम करेल, धम्म प्रसारकांना उचित मानधन देण्यात येईल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ही संकल्पना अस्तित्वात आणण्याचा मानस अध्यक्ष भाषणात प्रा. मुकुंद भारसाकळे यांनी व्यक्त केला. शैक्षणिक विकास साधण्यासाठी समाजाने एकसंघ आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी धम्मदान दात्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. सुरुवातीला बुद्ध वंदना घेऊन विचार मंचावर विराजमान प्रतिष्ठानचे प्रमुख प्रा. भारसाकळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विशेष पाहुणे म्हणून प्रतिष्ठानचे सचिव अशोक इंगळे, प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष रमेश तायडे , प्राचार्य हिमेश बाबू नानलवाल उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना तायडे यांनी तर आभारप्रदर्शन रमेश तायडे यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे