नाशिक, 12 मे (हिं.स.)।
नाशिक येथे होत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, राज्यस्तरीय १६ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट स्पर्धेत (एमसीए इन्विटेशन लीग), दोन दिवसीय कसोटी सामन्यात, पावसामुळे तीन पैकी दोन सामन्यात पहिला डावही पूर्ण होऊ शकला नाही. नाशिकने पहिल्या दोन सामन्यात चंद्रोस क्लब, पुणे पाठोपाठ पूर्व विभाग संघाविरुद्धही मोठा विजय मिळवला. पण त्यानंतर तिसरा धुळे विरुद्धचा सामना पावसामुळे सुरूच होऊ शकला नाही. तर, चौथ्या नांदेड संघाविरुद्धच्या सामन्यात हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर फक्त पहिल्याच दिवशी केवळ ४९.४ षटकांचा खेळ होऊ शकला. त्यात कर्णधार अक्षत भांडारकरच्या लागोपाठ दुसऱ्या सामन्यातील शतकाच्या - ११० धावा - जोरावर नाशिक संघाने ९ बाद २१६ धावांवर डाव घोषित केला. पण पावसामुळे त्यानंतर खेळ होऊ शकला नाही. याआधीच्या पूर्व विभाग संघाविरुद्धच्या सामन्यातही शतक झळकावत अक्षत भांडारकरने जोरदार १९२ धावा केल्या होत्या.
इतर सामन्यात मेरी क्रिकेट मैदानावर दीप पाटीलच्या नाबाद फटकेबाज १६४ धावांच्या जोरावर चंद्रोस क्लब, पुणेने पूर्व विभाग संघावर १ डाव व १३१ धावांनी मोठा विजय मिळवला. तर, क्रीडक क्रिकेट मैदानावर मेट्रो संघाविरुद्ध पहिल्या दिवशी धुळेच्या वीर पंजाबीने ही ११० धावा केल्या. पण पावसामुळे हा सामना देखील अनिर्णीत राहिला.
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI