वॉशिंगटन , 19 मे (हिं.स.)।अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना कॅन्सरने ग्रासलं आहे. बायडन यांना प्रोस्टेट ग्रंथींचा कॅन्सर झाल्यानं त्यांची प्रकृती ढासाळत चालली आहे. रविवारी(दि.१७) बायडन यांच्या कार्यलयाकडून याबाबत माहिती देण्यात आली.
बायडन यांच्या कार्यालयानं सांगितलं की, प्रोस्टेट कर्करोग त्यांच्या हाडांपर्यंत पसरला आहे. यानंतर आता बायडन यांच्यावर कॅन्सरची ट्रिटमेंट सुरु करण्याचा विचार त्यांचे कुटुंबिय करत आहेत. बायडन यांच्या लागण झाल्याचा आजार हा काहीसा आक्रमक स्वरुपाचा आजार आहे. पण कॅन्सरचे हार्मोन्स संवेदनशील असल्यानं ते नियंत्रित होऊ शकतात.मुत्रविसर्जनात त्रास होत असल्यानं बायडन यांनी शुक्रवारी (दि.१६) तपासणी करुन घेतली असता या तपासणीत त्यांच्या आजाराबाबतची माहिती समोर आली आहे.
प्रोस्टेट कॅन्सरला १ ते १० पर्यंत ग्लीसन स्कोअरद्वारे श्रेणीबद्ध (स्कोअर) केलं जातं. हे दाखवत की निरोगी पेशींच्या तुलनेत कॅन्सरची लागण झालेल्या पेशी कशा दिसतात. यामध्ये बायडन यांचा स्कोअर हा ९ इतका आहे. याचा अर्थ त्यांच्या कॅन्सरनं अधिक गंभीर स्वरुप धारण केलेलं आहे.२०१५ साली बायडेन यांचा मोठा मुलगा ब्यू बायडेन याचा कर्करोगानेच मृत्यू झाला होता. त्याला ग्लायोब्लास्टोमा नावाच्या मेंदूच्या अत्यंत धोकादायक कर्करोगाचे निदान झाले होते.त्यानंतर आता जो बायडन यांनाही प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झाल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत. बायडेन कुटुंबीय पुढील उपचारासाठी कर्करोग तज्ज्ञांचा सल्ला घेत आहेत.
बायडन यांना कॅन्सरची लागण झाल्याची बातमी कळताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं की, मेलानिया आणि जो बायडन यांच्या नुकत्याच समोर आलेल्या मेडिकल कंडिशनबाबत ऐकून दुःख वाटलं. जिल कुटुंबांसोबत (बायडन यांची पत्नी) आमच्या सद्भावना आहेत. आम्ही बायडन यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी आशा करतो.जो बायडेन हे ८२ वर्षांचे असून २०२१ ते २०२४ या कालावधीत ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. राष्ट्राध्यक्षपदाच्या शेवटच्या कार्यकाळात त्यांच्यावर सातत्याने वय आणि प्रकृती यावरून विरोधक टीका करत होते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या तीन महिन्यापूर्वी त्यांनी माघार घेतली आणि त्यांच्याजागी कमला हॅरिस यांचा उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, अमेरिकेच्या जनतेने बायडेन यांना नाकारले आणि ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode