इराणचा कतारच्या सर्वात मोठ्या गॅस केंद्रावर हल्ला
तेहरान, 19 मार्च (हिं.स.)।मध्य पूर्वेतील तणाव आता पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेला आहे. आत्मघाती ड्रोन हल्ल्यांनी इराकमधील अमेरिकन लष्करी तळाला लक्ष्य केले असून, त्याचवेळी कतारच्या गॅस हबवर क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला आहे. कतारची सरकारी ऊर्जा कं
इराणचा कतारच्या सर्वात मोठ्या गॅस केंद्रावर हल्ला


तेहरान, 19 मार्च (हिं.स.)।मध्य पूर्वेतील तणाव आता पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेला आहे. आत्मघाती ड्रोन हल्ल्यांनी इराकमधील अमेरिकन लष्करी तळाला लक्ष्य केले असून, त्याचवेळी कतारच्या गॅस हबवर क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला आहे.

कतारची सरकारी ऊर्जा कंपनी कतार एनर्जीने सांगितले की, गुरुवारी त्यांच्या अनेक लिक्विफाइड नॅचरल गॅस (एलएनजी) सुविधांवर क्षेपणास्त्र हल्ले झाले. या हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणात आग लागली असून आधी झालेल्या नुकसानीत आणखी वाढ झाली आहे. कंपनीने स्पष्ट केले की हे हल्ले यापूर्वी झालेल्या हल्ल्यानंतरच झाले. बुधवारी रास लफान इंडस्ट्रियल सिटीवर झालेल्या हल्ल्यात गॅस-टू-लिक्विड्स सुविधेचे मोठे नुकसान झाले होते.

इराणच्या सरकारी दूरदर्शननेही या हल्ल्याची पुष्टी केली. कतारचा प्रमुख गॅस प्रकल्प रास लफान रिफायनरी पुन्हा क्षेपणास्त्राने लक्ष्य करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हल्ल्यानंतर तेथे आग लागली असून मोठ्या प्रमाणात धूर उठताना दिसत आहे. इराणने टेलिग्रामवर पोस्ट करून रास लफान रिफायनरी जळत असल्याचे म्हटले आहे.यावरून हल्ले थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. आधीच्या हल्ल्यातही मोठ्या नुकसानीची माहिती कतारने दिली होती आणि नव्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.

सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांनी स्पष्ट इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले की, इराण शेजारी देशांवर हल्ले करून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र सौदी अरेबिया या दबावाला झुकणार नाही आणि गरज पडल्यास लष्करी कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार राखून ठेवतो.रियाधमध्ये प्रादेशिक परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीनंतर प्रिन्स फैसल म्हणाले की, असा दबाव उलट परिणाम करणारा ठरेल. सौदी अरेबियाने यापूर्वीही स्पष्ट केले आहे की, तो प्रत्युत्तरात्मक कारवाई करण्यास मागे हटणार नाही.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर लिहिले की, इराणच्या साउथ पार्स गॅस फील्डवर आता कोणताही हल्ला होणार नाही. मात्र जर इराणने पुन्हा कतारच्या एलएनजी प्रकल्पांवर हल्ला केला, तर अमेरिका त्या संपूर्ण क्षेत्राचा अभूतपूर्व ताकदीने नाश करेल.ट्रम्प यांनी म्हटले, “या विशिष्ट हल्ल्याबाबत अमेरिकेला कोणतीही पूर्वकल्पना नव्हती आणि कतार देशाचाही त्यात कोणताही सहभाग नव्हता किंवा असा हल्ला होईल याची त्यांना कल्पनाही नव्हती. दुर्दैवाने, इराणकडे साउथ पार्स हल्ल्याशी संबंधित आवश्यक माहिती नव्हती आणि त्यांनी चुकीच्या समजुतीतून कतारच्या एलएनजी सुविधेच्या एका भागावर हल्ला केला.”

ते पुढे म्हणाले की, “या अत्यंत महत्त्वाच्या आणि मौल्यवान साउथ पार्स फील्डच्या बाबतीत इस्रायल आता कोणताही पुढील हल्ला करणार नाही, जोपर्यंत इराण पुन्हा निरपराध देश कतारवर हल्ला करण्याचा निर्णय घेत नाही. जर तसे झाले, तर अमेरिका — इस्रायलची मदत किंवा परवानगी असो वा नसो — साउथ पार्स गॅस फील्ड पूर्णपणे उद्ध्वस्त करेल, आणि ती कारवाई इतकी प्रचंड शक्तिशाली असेल की इराणने यापूर्वी कधी अनुभवली नसेल.”ट्रम्प यांनी शेवटी म्हटले की, “मी इतकी हिंसा आणि विनाश होऊ द्यायचा नाही, कारण त्याचा इराणच्या भविष्यात दीर्घकालीन वाईट परिणाम होईल. मात्र कतारच्या एलएनजी सुविधांवर पुन्हा हल्ला झाला, तर कारवाई करण्यास मी अजिबात मागेपुढे पाहणार नाही.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande