
इस्लामाबाद , 19 मार्च (हिं.स.)।पाकिस्तानची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराची शहरात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी मोठी हानी घडवून आणली आहे. हवामानाशी संबंधित घटनांमध्ये अडकून किमान १९ जणांचा मृत्यू झाला आहे. पाऊस आणि वादळामुळे झालेल्या मृत्यूंनंतर शहर प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बुधवारी रात्री कराचीमध्ये जोरदार वाऱ्यांमुळे अनेक घरांची छपरे उडाली आणि भिंती कोसळल्या. अनेक ठिकाणी झाडे आणि साइनबोर्ड पडले. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले. पाकिस्तान हवामान विभागाने गुरुवारी आणखी पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याचा इशारा दिला आहे.
कोरांगीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संघार मलिक यांनी सांगितले की, वादळादरम्यान छत आणि भिंत कोसळल्याने १२ जणांचा मृत्यू झाला. ज्या ठिकाणी ही घटना घडली, तेथे लोक चहा पित बसले होते. त्यांनी सांगितले, “वादळ, जोरदार वारे आणि पावसामुळे सईदाबाद परिसरातील मोचको गोठ येथेही एक इमारत कोसळली आहे.”
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, बचाव पथक अद्याप ढिगारा हटवण्याचे काम करत असून मलब्याखाली आणखी लोक अडकले असण्याची शक्यता आहे. पोलीस उपमहानिरीक्षक असद रझा यांनी गुरुवारी सकाळी माध्यमांशी बोलताना सांगितले की, कोरांगी भागात एका घराचे छत कोसळल्याने त्या घरात राहणाऱ्या दाम्पत्याचा मृत्यू झाला. याशिवाय मलिर येथे दोन जणांवर वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला. तसेच लांधी भागातील मजीद कॉलनीमधूनही जीवितहानीची बातमी समोर आली आहे, तर क्लिफ्टन येथे पडलेल्या झाडाखाली दबून एका महिलेचा मृत्यू झाला. महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.
कराचीचे महापौर मुर्तजा वहाब यांनी खराब हवामान लक्षात घेऊन नागरिकांनी घरातच राहावे आणि विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. अहवालानुसार, मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. हवामान विभागाने सिंध प्रांतातील इतर भागांमध्येही पुढील दोन दिवस पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode