काठमांडू, २० मे, (हिं.स) : मंगळवारी नेपाळमध्ये भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवले, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.
पहिला भूकंप दुपारी अंदाजे १ वाजून ४४ मिनिटांनी जाणवला, ज्याची तीव्रता ३.९ रिश्टर स्केल इतकी होती. यानंतर पश्चिम नेपाळमधील कास्की जिल्ह्यात ४.७ तीव्रतेचा दुसरा भूकंप झाला.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र आणि संशोधन केंद्राच्या माहितीनुसार, दुसऱ्या भूकंपाचे केंद्र काठमांडूपासून सुमारे २५० किलोमीटर अंतरावर असलेल्या सिनुवा भागात होते. या भूकंपाचे धक्के शेजारील तनहु, पर्वत आणि बागलुंग जिल्ह्यांमध्येही जाणवले.
सुदैवाने, या दोन्ही भूकंपांमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मालमत्तेची हानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान, १४ मे रोजी नेपाळच्या सोलुखुम्बू जिल्ह्यातील छेस्कम भागात ४.६ तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्यानंतर १५ मे रोजीदेखील याच भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. या सर्व घटनांबाबत प्रशासन सतर्क असून, नागरिकांनी घाबरून न जाता योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर