पंजाबमध्ये सर्व शैक्षणिक संस्था बंद, परीक्षा रद्द
चंदीगड , 9 मे (हिं.स.) : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' या कारवाईनंतर भारत-पाकिस्तान तणावात वाढ होत असताना, पाकिस्तानशी ५३२ किमीची सीमा असलेल्या पंजाबने सर्व शैक्षणिक संस्था बंद करण्याचे आणि परीक्षा रद्द करण्या
Panjab exam cancel


चंदीगड , 9 मे (हिं.स.) : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' या कारवाईनंतर भारत-पाकिस्तान तणावात वाढ होत असताना, पाकिस्तानशी ५३२ किमीची सीमा असलेल्या पंजाबने सर्व शैक्षणिक संस्था बंद करण्याचे आणि परीक्षा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

जालंधर येथील आय.के. गुजराल पंजाब टेक्निकल युनिव्हर्सिटीने आज, शुक्रवारी सांगितले की, अनपेक्षित परिस्थितीमुळे अंतिम सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यात म्हटले आहे की, परीक्षांचे सुधारित वेळापत्रक नवीन तारखेच्या किमान पाच दिवस आधी जाहीर केले जाईल. राज्य सरकारने लोकांच्या सोयीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. लँडलाइन फोन नंबरवर संपर्क साधता येईल- ०१७२-२७४१८०३ आणि ०१७२-२७४९९०१.

राज्याचे शिक्षण मंत्री हरजोत सिंग बैंस म्हणाले की, सध्याची परिस्थिती पाहता, पंजाबमधील सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे - सरकारी, खाजगी आणि अनुदानित - पुढील तीन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात येत आहेत. गुरुवारी रात्री पंजाबच्या सहा सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये - फिरोजपूर, पठाणकोट, फाजिलका, अमृतसर, गुरुदासपूर आणि तरनतारन - वीजपुरवठा खंडित झाल्याची नोंद झाली. पंजाब आणि हरियाणाची संयुक्त राजधानी असलेल्या चंदीगडमध्ये अधिकाऱ्यांनी शनिवार(दि. १०) पर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.

दुसरीकडे, गुरुवारी फिरोजपूर सेक्टरमध्ये सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) एका पाकिस्तानी घुसखोराला ठार मारले. शुक्रवारी सकाळी भारत आणि पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडताना घुसखोराला गोळ्या घालून ठार मारण्यात आले, ज्याची अद्याप ओळख पटलेली नाही. लखा सिंग वाला बीएसएफ चौकीजवळील एका गेटजवळ घुसखोर घुसण्याचा प्रयत्न करताना दिसला.भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंजाबमधील काही सीमावर्ती गावांमधील लोक सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होऊ लागले आहेत. त्याच वेळी, पंजाब पोलिसांच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या. पंजाब आम आदमी पक्षाचे प्रमुख अमन अरोरा म्हणाले की, राज्य सरकार आणि सर्व ३ कोटी पंजाबी भारतीय सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. पाकिस्तानच्या कोणत्याही हल्ल्याला योग्य उत्तर देण्यासाठी राज्य पोलिस दल प्रत्येक लढाईत भारतीय सैन्यासोबत सामील होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande