नवी दिल्ली, ९ मे (हिं.स.) : भारत-पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या हल्ला प्रतिहल्ला दरम्यान मूळचे आंध्र प्रदेशचे असलेले जवान मुरली नाईक (२३) यांना वीरमरण आले आहे. त्यांच्या कुटुंबीयांचे वास्तव्य काही काळ मुंबईतील घाटकोपरमध्ये देखील होते. आज, शुक्रवारी पहाटे ३ वाजता सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यात त्यांना वीरमरण आले.
या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ट्विट करुन शहीद जवान मुरली नाईक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. नाईक हे सत्यसाई जिल्ह्यातील गोरंटला तालुक्यातील रहिवाशी होते. देशासाठी बलिदान देणाऱ्या मुरली नाईक यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, नाईक कुटुंबीयांप्रती सहवेदना आहेत.
अधिक माहितीनुसार, नाईक यांचे कुटुंब काही काळ घाटकोपरच्या कामराज नगरमध्ये वास्तव्यास होते. नाईक यांचे कुटुंब हे कामराज नगरच्या झोपडपट्टीमध्ये राहत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी सदरची झोपडपट्टी पुनर्विकासात गेल्याने त्यांची घरे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे, सध्या नाईक यांचे कुटुंब आंध्र प्रदेशाला राहण्यास गेले होते.
मुरली यांचा जन्म श्री सत्यसाई जिल्ह्यातील 'थांडा' या त्यांच्या मूळगावीच झाला होता. त्यांचं प्राथमिक शिक्षणही तिथेच झाले. मुरली शालेय जीवनापासूनच अभ्यास आणि मैदानी खेळांमध्ये आघाडीवर होते. पुढे मुंबईत आल्यावर त्यांनी नाशिकच्या सैनिकी शाळेत प्रवेश घेतला. त्यांच्या या निर्णयावर वडील तितकेसे खूश नव्हते. मुलानं दुसरं काहीतरी करावं, अशी त्यांची फार इच्छा होती. मात्र देशसेवेबाबत मुरली ठाम असल्याचं त्यांचे वडील श्रीराम नाईक यांनी सांगितले.
दरम्यान नाईक यांच्या हौतात्म्याला वंदन करत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकार नाईक कुटुंबीयांच्या पाठीशी आहे. नाईक कुटुंबीयांची सर्व माहिती घेत त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी