
नवी दिल्ली , 02 जानेवारी (हिं.स.)।पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील निर्वासित बलोच नेते मीर यार बलोच यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांना एक खुले पत्र लिहिले आहे. या खुल्या पत्रात मीर यार बलोच यांनी भारत आणि बलुचिस्तान यांच्यातील ऐतिहासिक संबंधांचा उल्लेख करत परस्पर सहकार्य वाढवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी बलुचिस्तानमधील सहा कोटी नागरिकांच्या वतीने भारतातील १४० कोटी जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
या खुल्या पत्रात मीर यार बलोच यांनी भारत आणि बलुचिस्तान यांच्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि व्यापारी संबंधांवर प्रकाश टाकला आहे. त्याचबरोबर त्यांनी भारताने पाकिस्तानला मुळासकट उखडून टाकावे, अशी मागणीही केली आहे. या प्रकरणात बलुचिस्तानचा प्रत्येक नागरिक भारताच्या बाजूने असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
पत्रात त्यांनी लिहिले आहे की, हिंगलाज माता मंदिरासारखी पवित्र स्थळे ही आपल्या सामायिक वारशाची प्रतीके आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चे त्यांनी कौतुक केले असून, मोदी सरकारच्या धाडसी आणि ठाम कारवाईचे अभिनंदन केले आहे.मीर यार बलोच यांनी लिहिले आहे की, बलुचिस्तानचे लोक गेल्या ६९ वर्षांपासून पाकिस्तानच्या दडपशाहीला सामोरे जात आहेत. आता ही गंभीर समस्या मुळापासून संपवून आपल्या देशाची सार्वभौमता सुनिश्चित करण्याची वेळ आली आहे.
या पत्रात चीन आणि पाकिस्तान यांच्यात वाढत चाललेल्या जवळिकीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यवादी सैन्यांना लवकर बळकट केले नाही, तर चीन येथे आपले सैनिक तैनात करू शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे. बलुचिस्तानमध्ये चिनी सैन्याची उपस्थिती भविष्यात भारत आणि बलुचिस्तान दोघांसाठीही धोका आणि आव्हान ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode