
जयपूर, 02 जानेवारी (हिं.स.) । राजस्थानच्या जयपूर जिल्ह्यातील चौमूमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचारानंतर आजपासून बुलडोझर कारवाई सुरू झाली आहे. बेकायदेशीर बांधकामे बुलडोझरने पाडली जात आहेत. घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलीस दल उपस्थित आहे.
काही दिवसांपूर्वी चौमूमध्ये मशिदीबाहेर रेलिंग लावण्यावरून वाद निर्माण झाला होता. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. आंदोलकांकडून झालेल्या दगडफेकीत अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले होते, तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधूराच्या नळकांड्या फेकण्यात आल्या होत्या. या हिंसाचारानंतर पोलीस व प्रशासन सतर्क झाले असून आज बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली जात आहे.चौमूमध्ये मशिदीच्या आसपास अतिक्रमणाच्या कक्षेत येणाऱ्या दुकाने आणि घरांच्या बाहेर यापूर्वीच नोटिसा लावण्यात आल्या होत्या. या नोटिसांमध्ये संबंधित नागरिकांना 31 डिसेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आज सकाळपासून प्रशासनाची कारवाई सुरू असून बुलडोझरच्या सहाय्याने बेकायदेशीर बांधकामे पाडली जात आहेत.
स्थानिक प्रशासन इमाम चौक परिसरातील बेकायदेशीर बांधकामे हटवण्यासाठी कारवाई करत आहे. चौमू पोलीस ठाण्याचे एसएचओ प्रदीप शर्मा यांनी सांगितले की, जे चुकीचे आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आम्ही नगरपरिषदेबरोबर येथे उपस्थित आहोत. नगरपरिषदेनं अतिक्रमणांची ओळख पटवली असून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. जयपूर पश्चिमचे एडीसीपी राजेश गुप्ता यांनी सांगितले की, नगरपरिषद ही कारवाई करत आहे. बेकायदेशीर बांधकामे पाडली जात आहेत आणि अतिक्रमणे हटवली जात आहेत. एकूण 19 ते 20 नोटिसा देण्यात आल्या असून त्या सर्वांवर कारवाई केली जात आहे. काही दिवसांपूर्वी गोंधळ घालणाऱ्या लोकांची बेकायदेशीर अतिक्रमणेही पाडली जात आहेत.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी