कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलद व पारदर्शक पद्धतीने देणे सुलभ व्हावे, याकरिता केंद्र शासनाने दि.14 ऑक्टोबर 2024 पासून महाराष्ट्रासह देशातील 24 राज्यांमध्ये ‘अॅग्रीस्टॅक’ योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांची आधार क्रमांकाशी संलग्न माहिती एकत्रित करून त्यांना विशिष्ट ओळख क्रमांक प्रदान करणे, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या कृषी योजनांचा त्वरित लाभ मिळवून देणे, हा या योजनेचा उद्देश आहे.
याशिवाय हंगामी पिके, भू-शास्त्रीय माहिती आणि अन्य महत्त्वाचे डेटा गोळा करून त्यांचे सतत अद्ययावतीकरण करणे, कृषी कर्ज आणि विमा सेवांचा लाभ सहज मिळवून देणे, किमान आधारभूत किंमत व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी ऑनलाईन नोंदणीद्वारे शेतमाल खरेदी प्रक्रिया सुलभ करणे, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी कृषी क्षेत्रातील डिजिटल परिवर्तनाला गती देणे आणि नाविन्यपूर्ण उपाययोजनांना प्रोत्साहन देणे हादेखील ‘अॅग्रीस्टॅक’ योजना राबविण्यामागील उद्देश आहे. या लेखाच्या माध्यमातून ‘अॅग्रीस्टॅक’ योजनेविषयी अधिक माहिती जाणून घेवू या…
अॅग्रीस्टॅक म्हणजे काय?
शेतीशी संबंधित सर्व घटकांना शेतकरी ग्राहक विक्रेते आणि सरकार यांना एकत्र करणारी एक क्रांतिकारक प्रणाली आहे. यामधून शेतकऱ्यांची ओळख फार्मर आयडी निश्चित करून शेतीच्या सर्व प्रक्रियांमध्ये अचूकता आणि पारदर्शकता आणली जाईल.
फार्मर आय डी म्हणजे काय?
फार्मर आयडी हा शेती शेतकऱ्यांसाठी अद्वितीय ओळख क्रमांक आहे तो अॅग्रीस्टॅक अंतर्गत तयार केला जातो ज्यामध्ये शेतकऱ्यांचा आधार क्रमांक जमिनीचा सातबारा ही माहिती समाविष्ट आहे.
अॅग्रीस्टॅक योजनेचे शेतकऱ्यांसाठी अपेक्षित फायदे:
· शेतकऱ्याची व त्यांच्या शेत जमिनीची ओळख पटविणार व शेतकऱ्यास अद्वितीय शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) मिळणार.
· शेतकऱ्यांना सर्व कृषी योजनांचा लाभ मिळण्यामध्ये सुलभता येते.
· पीएम किसान योजनेचा लाभ प्राप्त करण्यामध्ये शेतकऱ्यांना सुलभता येते.
· पीएम किसान योजनेंतर्गत पात्र सर्व लाभार्थीचा समावेश.
· पिक कर्जासाठी किसान क्रेडीट कार्ड आणि कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड व इतर कृषी कर्ज उपलब्धतेसाठी सुलभता.
· पिक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे सर्वेक्षणामध्ये सुलभता.
· किमान आधारभूत किंमतीवर खरेदीमध्ये शेतकऱ्यांचे नोंदणीकरण ऑनलाईन पध्दतीने होवू शकेल.
· शेतकऱ्यांना सेवा देणाऱ्या यंत्रणांना या सेवेसाठी सुलभता.
· शेतकऱ्यांना वेळेवर कृषी विषयक सल्ले उपलब्ध होणे, विविध संस्थांना शेतकऱ्यांना संपर्क करण्याच्या संधीमध्ये वाढ.
· हवामानाची अचूक माहिती मृदा आरोग्य तपशील आणि योग्य पीक सल्ला मिळतो.
· पीक पेरणी उत्पादन वाढीसाठी अचूक मार्गदर्शन मिळते.
शेतकरी ओळख क्रमांकासाठी काय आवश्यक आहे?
शेतकऱ्याचा आधार नंबर, आधार संलग्न मोबाईल नंबर आणि शेतजमिनीचे खाते नंबर.
शेतकरी ओळख क्रमांकासाठी कोणाकडे संपर्क करावा?
संबंधित गावातील ग्राम महसूल अधिकारी / कृषी सहायक / ग्राम विकास अधिकारी, नागरी सुविधा केंद्र (CSC)
केवळ दोनच मिनिटात मिळवा शेतकरी ओळख क्रमांक:
जर का अजूनही फार्मर आयडी आपण निर्माण केला नसेल तर आजच आपले आधारकार्ड व आधार क्रमांकाशी जोडलेला मोबाईल क्रमांक तसेच शेतजमिनीचे खाते नंबर घेऊन नजिकच्या नागरी सुविधा केंद्राशी संपर्क करा व आपला शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले आहे.
रामेश्वर पाचे
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
ठाणे
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर