नाशिक, 14 जून (हिं.स.)। शहरासह जिल्ह्यात शेतीमाल व वाहनांची चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून महिंद्रा कंपनीच्या तीन पिकअप गाड्या, होण्डा कंपनीची एक दुचाकी व दोन मोबाईल फोन जप्त केले. पोलिसांनी चोरांच्या पिकअपला शिताफीने जीपीएस लावला होता. त्यामुळे त्यांची हालचाल पाहून पोलिसांनी ही कार्यवाही केली. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.
याबाबत, पंचवटी विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त पद्मजा बढे यांनी सांगितले की, म्हसरुळ पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या गुन्हयाचा तपास करीत असताना १० जून २०२५ ला गुन्हे शोध पथक पेट्रोलिंग करीत होते. तेव्हा दाखल गुन्ह्यात गोपनीय माहिती पोलिस हवालदार राकेश शिंदे यांना मिळाली की, या गुन्ह्यातील संशयित योगेश धोंडीराम गांगुर्डे (रा. मडकेजांब, ता. दिंडोरी) याने त्याचा साथीदार पप्पू उर्फ रविंद्र बाळू पोरे (रा. इंदोरे, ता. दिंडोरी) हे गुन्ह्यासाठी वापरलेली पिकअप गाडी (एमएच ११ टी ३३५४) घेऊन दिंडोरीरोडने येणार आहे. त
यानुसार पोलिसांनी सापळा रचला. हे वाहन येताच त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला असता संशयित हे गाडीसह पळाले. त्यावेळी पथकाने आरोपींचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. संशयित व त्याचा मित्र पप्पू उर्फ रविंद्र बाळू मोरे यांच्यासह म्हसरुळ परिसरात सोयाबीन, गहू, तांदूळ चोरी करीत असल्याचे सांगितले. संशयित योगेश धोंडीराम गांगुर्डे यांच्या ताब्यात महिंद्रा कंपनीच्या तीन पिकअप, एक दुचाकी व दोन मोबाईल आढळले. तसेच एक लाख ५३ हजार रूपये किमतीचा सोयाबिन, गहू, तांदळाचा ३२ क्विंटल शेतमाल, असा १० लाख ८७ हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI