दिंडोरी, 15 जून (हिं.स.)।तालुक्यातील कोचरगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाच जण जखमी झाले असून त्यांना तातडीने नाशिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
वामन नाना लिलके हे पांडूरंग देसले यांच्या पडित क्षेत्रात शौचविधीसाठी गेले असता झाडाझुडपात लपलेल्या बिबट्याने हल्ला करुन जखमी केले. त्यांचा आवाज ऐकून शेजारी शेतात काम करणारे व रस्त्याने जाणारे सोमनाथ केरु लिलके, विठ्ठल केरु लिलके, लहानू कचरु लिलके, लहानू पांडूरंग लिलके त्यांना वाचविण्यासाठी गेले असता यांना देखील बिबटयाने हातावर, मांडीवर चावा घेतला. पाठीवर पोटावर पंजाचे जखमा केल्या आहेत. जखमींना स्थानिकांनी तात्काळ कोचरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन उपचार दिले. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तेथे वनकर्मचारी यांनी दाखल झाले होते. उपचार सुरु असून जखमींची प्रकृती स्थिर आहे. घटनास्थळाची सहाय्यक वनसंरक्षक संतोष सोनवणे, वनपरीक्षेत्र अधिकारी सुशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अशोक काळे, वनरक्षक बागुल, वनरक्षक गांगोडे, वनसेवक पेलमहाले, शिरसाठ, जाधव, भुसारे, स्थानिक पोलिस पाटील लिलके, ग्रा.पं. सदस्य टोंगारे यांनी पाहणी करुन आजूबाजूचे शेतकरी, मजूर तसेच ग्रामस्थांना खबरदारीबाबत सूचना केल्या आहेत. पडित शेत हे 10 ते 12 एकर असल्याने हल्ला करणारा बिबटे त्याच ठिकाणी लपल्याचे स्थानिक माहिती मिळाल्याने तेथे पिंजरा लावण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI