ठाणे, 15 जून (हिं.स.)। कोमसापच्या कळवा शाखेची सुरुवात माऊलींच्या पसायदान या कार्यक्रमाने झाली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वारकरी संप्रदायची धुराच कळवा शाखेने आपल्या खांद्यावर घेतली असून ठाण्यातील सांस्कृतिक चळवळ कोमसापची ही कळवा शाखा पुढे नेईल असा विश्वास ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी प्रा. अशोक बागवे यांनी व्यक्त केला. आपल्या खास शैलीत प्रा. अशोक बागवे यांनी माउलींच्या पसायदानाचे केलेले निरूपण रसिकांना एक वेगळी अनुभूती देऊन गेले.
कोमसापच्या कळवा शाखेच्या वतीने तसेच मनीषा विद्यालय आणि यशोगंगा संस्था यांच्या सहकार्याने
प्रा. अशोक बागवे यांच्या अभ्यासातून सादर करण्यात येत असलेल्या माऊलींचे पसायदान या पहिल्या जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा.प्रदीप ढवळ, ठाणे जिल्हाध्यक्ष बाळ कांदाळकर, मनीषा विद्यालयाचे प्राचार्य पाष्टे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. अशोक बागवे यांनी यावेळी कोमसापच्या कळवा शाखेचे विशेष कौतुक यावेळी केले. कोमसापची पहिली ही शाखा आहे ज्या शाखेने पहिलाच जाहीर कार्यक्रम हा माऊलींच्या पसायदाचा ठेवला. त्यामुळे कळवा शाखेने जाणू वारकरी संप्रदायची धुराच खांद्यावर घेतली आहे. पुणे आणि मुंबईत आता कार्यक्रमांसाठी रसिक जात नाहीत मात्र कोमसापच्या पहिल्याच कार्यकमाला एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली रसिकांची गर्दी पाहता कळवा शाखा ही ठाण्यातील सांस्कृतिक चळवळ पुढे नेईल असा विश्वास प्रा. बागवे यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या केंद्रीय अध्यक्षा नमिता किर यांनी कळवा शाखेला शुभेच्छा देत या शाखेची सुरुवात माउलींच्या पसायदानाने झाली याचा विशेष आनंद वाटत असल्याचे सांगितले. प्रा. प्रदीप ढवळ यांनी कळवा शाखा ही कोमसापची 72 वी शाखा असून नवोदित साहित्यिक लेखकांना एक हक्काचे व्यासपीठ मिळाले असल्याचे सांगितले. पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनी कोमसापची स्थापना केली. आज प्रत्येक शाखेत वेगवेगळे साहित्यिक कार्यक्रम सुरु असतात, कळव्यातील साहित्य क्षेत्रातील मंडळींनी एकत्र येऊन ही शाखा स्थापन केली याचा विशेष आनंद वाटत असल्याचे प्रा.ढवळ यांनी सांगितले. तर कळवा शाखेचे अध्यक्ष निशिकांत महांकाळ यांनी कळवा शाखेची भूमिका स्पष्ट करत यापूढे मोठ्या प्रमाणात साहित्यिक उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर