शिवसेनेच्या वर्धापनदिनाला सोडले टीकेचे क्षेपणास्त्र
मुंबई, 19 जून (हिं.स.) : हिंदुत्व बाजुला सोडून दिले, मतदारांना धोका दिला, सत्तेसाठी अगतिक आणि लाचार बनलेत अशा शब्दा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणाचेही नाव न घेता शिवसेनेच्या उबाठा-गटावर टीकास्त्र सोडले. शिवसेनेच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त आज, गुरुवारी वरळी येथे आयोजित मेळ्याव्यात ते बोलत होते.
याप्रसंगी एकनाथ शिंदे म्हणाले की हा मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे तर दुसरा मेळावा सत्तेसाठी लाचारांचा असलेल्यांचा आहे. 80 टक्के समाजकारण म्हणजे, शिवसेनेचे धनुष्यबाण आमच्याकडे, जनतेचा आशिर्वाद आमच्याकडे, शिवसेनेला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. गेल्या वर्षी 2024 मधल्या निवडणुकीत शिवसेनेचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त होता. तर उबाठा गटाचा स्ट्राईक रेट फक्त 23 टक्के आहे. मतदारांनी ठाकरे गटाला कधीच टाटा-बाय-बाय केलंय. आपल्याकडे आत्मविश्वास आहे. त्यांच्याकडे अहंकार आहे. हा अहंकार त्यांना विनाशाकडे नेतोय. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या काँग्रेसला आयुष्यभर विरोध केला. त्याच काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप कोणी केलं हे आपल्याला माहिती आहे. सत्तेसाठी लाचारी पत्करण्याचं काम कोणी केलं हेही आपल्याला माहिती आहे. त्यांनी 2019 साली मराठी माणसांचा विश्वासघात केला. महाराष्ट्राचा विश्वासघात केला. सरडाही रंग बदलतो. पण इतक्या वेगाने रंग बदलणारा सरडादेखील महाराष्ट्राने पाहिला. त्यांचेच सगेसोयरे, भाऊबंद हे सांगत आहेत, अशी थेट टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
देशद्रोह्यांची देशभक्तांशी तुलना करणे हे तुमचे हिंदुत्व आहे का? ‘हनुमान चालीसा’ म्हणणाऱ्यांना जेलमध्ये टाकले, हे तुमचे हिंदुत्व होते का ? बाळासाहेबांचे स्वप्न होते की, अयोध्येत राम मंदिर बांधावे आणि जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 हटवावे. बाळासाहेब म्हणायचे, मला एक दिवस पंतप्रधान करा, ही दोन्ही कामे मी करेन. ही दोन्ही कामे कोणी केली ? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी केली. बाळासाहेबांचे स्वप्न साकार करणाऱ्यांना शिव्या आणि बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला कायम दूर ठेवले, त्या काँग्रेसच्या नावाने ओव्या गाता! हे कसले हिंदुत्व आहे ? असा सवाल शिंदेंनी केला.
दरम्यान, षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेच्या ठाकरे गटाचाही वर्धापन दिन पार पडला. या कार्यक्रमात बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील दंगली, बाळासाहेब ठाकरे आणि नाना पाटेकर यांच्या प्रहार चित्रपटातील ‘कम ऑन, किल मी’ या संवादाचा उल्लेख केला होता. उद्धव ठाकरे यांच्या या टिप्पणीला नाव न घेता एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, “ते ‘कम ऑन, किल मी’ असे म्हणाले. इंग्रजी चित्रपट पाहून आले असतील, असे वाटते. पण मला एकच सांगायचं आहे, मेलेल्याला काय मारायचे? महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीत तुमचा मुडदा पाडलेला आहे अशी बोचरी टीका केली.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी