आळंदी : इंद्रायणीला पूर, भक्ती-सोपान पूलही पाण्याखाली
पुणे , 19 जून (हिं.स.) : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पूर्वसंध्येला आळंदी आणि परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने इंद्रायणी नदीने रौद्र रूप धारण केले आहे.नदीला मोठा पूर आला असून, ती दुथडी भरून वाहत आहे. या पूरस्थितीमुळे घा
Indryani river


पुणे , 19 जून (हिं.स.) : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पूर्वसंध्येला आळंदी आणि परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने इंद्रायणी नदीने रौद्र रूप धारण केले आहे.नदीला मोठा पूर आला असून, ती दुथडी भरून वाहत आहे. या पूरस्थितीमुळे घाटावरील सर्व मंदिरे, पोलिसांचे स्वागत कक्ष आणि महिलांसाठी असलेले चेंजिंग रूम पाण्याखाली गेले आहेत. प्रसिद्ध भक्ती-सोपान पूलही पाण्याखाली गेल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत एक भाविक इंद्रायणी नदीमध्ये वाहून गेल्याची घटना घडली. पाण्याचा प्रवाह असल्याने संबंधित भाविक जुन्या पुलापर्यंत वाहून गेला. सुदैवाने या भाविकाने मोठे धाडस दाखवत जुन्या पुलाशेजारी एका झाडाला पकडले. तात्काळ आळंदी नगरपरिषद व एनडीआरएफच्या पथकाने मोठ्या शिताफीने त्यास पाण्याबाहेर काढून जीवदान दिले. संबंधित भाविकास रुग्णवाहिकेद्वारे आळंदी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. इंद्रायणीच्या पाण्याची पातळी धोकादायक पातळीवर पोहोचली असून, पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान आणि अक्राळविक्राळ बनला आहे. पुराच्या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात जलपर्णीही वाहत येत आहे. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत नदीघाट पूर्णपणे बंद केला असून, भाविकांना घाटावर प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने इंद्रायणी नदीच्या घाटावर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जीवरक्षक पथके सज्ज ठेवण्यात आली असून, नदीपात्रात दोन बोटीही तैनात करण्यात आल्या आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून भाविकांनी इंद्रायणी नदीत जाऊ नये असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केले होते. तरीसुद्धा काही भाविक सूचनेचे पालन न करता इंद्रायणीत स्नानासाठी जात आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास इंद्रायणीकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. आळंदीत पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने भाविकांची गैरसोय होत आहे. मात्र, या नैसर्गिक आपत्तीनंतरही आळंदीत दाखल होणाऱ्या दिंड्या आणि वारकऱ्यांच्या उत्साहात तीळमात्रही घट झालेली नाही. पावसाच्या जोरदार धारा झेलत, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात वारकरी मोठ्या भक्तिभावाने आळंदीत प्रवेश करत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील माऊलींच्या भेटीची ओढ आणि वारीतील सहभागाचा आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande