नाशिक, 2 जून (हिं.स.) : पेठ रोडवरील फुलेनगर येथील गौडवाडी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास युवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, फुलेनगर येथील मनपा शाळा क्र. 56 समोर असलेल्या प्रवीण किराणा दुकानाजवळ संजय तुळशीराम सासे (वय 40, रा. घर क्र. 1288, महालक्ष्मी चाळ, महाराणा प्रताप नगर, पेठ रोड, पंचवटी) हे बसलेले असताना अज्ञात इसमांनी त्यांच्या डोक्यात विटा मारुन त्यांना जिवे ठार मारुन तेथून पळून गेले. पंचवटी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत एका संशयिताला ताब्यात घेतले. हा खून नेमका कोणत्या कारणाने झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी रुपाली संजय सासे यांच्या फिर्यादीवरुन पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
----------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI