येवदा सरपंच प्रतिभा माकोडे तिसऱ्यांदा अपात्र
अमरावती, 20 जून, (हिं.स.) दर्यापूर तालुक्यातील येवदा ग्रामपंचायतीतील राजकीय नाट्याने पुन्हा एकदा जोर धरला आहे. ग्रामविकास व पंचायत राज मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार, येवदा ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच श्रीमती प्रतिभा माकोडे यांना त्य
येवदा सरपंच प्रतिभा माकोडे तिसऱ्यांदा अपात्र


अमरावती, 20 जून, (हिं.स.) दर्यापूर तालुक्यातील येवदा ग्रामपंचायतीतील राजकीय नाट्याने पुन्हा एकदा जोर धरला आहे. ग्रामविकास व पंचायत राज मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार, येवदा ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच श्रीमती प्रतिभा माकोडे यांना त्यांच्या पदावरून तिसऱ्यांदा अपात्र घोषित करण्यात आले आहे. प्रदीप वडतकर, येवदा यांनी दाखल केलेल्या अपीलावर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणात तक्रारदार प्रदीप वडतकर आणि त्यांचे कायदेशीर सल्लागार अधिवक्ता अरविंद गुळदे यांचा युक्तिवाद महत्त्वाचा ठरला. यामुळे येवदा ग्रामपंचायतीच्या कारभारातील अस्थिरता पुन्हा एकदा समोर आली आहे.

प्रकरणाची पार्श्वभूमी आणि मुख्य आरोप : ग्रामसभा बेकायदेशीरपणे तहकूब करणे, दुकान गाळा भाड्याने देण्याबाबत अनियमितता, मालमत्तेच्या हस्तांतरणात नियमांचे उल्लंघन, पाण्याच्या टाकीच्या जागेचा वाद या सर्व आरोपांविरोधात प्रदीप वडतकर यांनी दाखल केलेल्या तक्रारींवरून सरपंच प्रतिभा माकोडे यांना तब्बल तीन वेळा अपात्र होण्याची वेळ आली. सरपंच प्रतिभा राजेंद्र माकोडे यांना विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आदेशानुसार प्रथम २२ जानेवारी २०२५ रोजी सरपंच पदावरून अपात्र घोषित करण्यात आले होते. परंतु उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार घ अपात्र घोषित झाल्यापासून त्यांना तीन आठवड्याची मुदतवाढ मिळाली होती. त्यांची ही मुदत १२ फेब्रुवारीला संपल्याने ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमानुल्ला खा दिलावर खा यांना सरपंच पदाचा प्रभार सोपविण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या प्रकरणात २६ जानेवारीची ग्रामसभा न घेण्याच्या प्रदीप वंडतकर यांच्या तक्रारीवरून कर्तव्यात कसुर केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी यांनी २४ फेब्रुवारीला सरपंच आणि सदस्य पदावरून दुसऱ्यांदा अपात्र घोषित केले होते. त्यानंतर माकोडे यांनी विभागीय आयुक्तांच्या निर्णयाला मंत्रालयातून ७ मार्च रोजी स्थगिती मिळविली व दुसऱ्या प्रकरणात त्यांना दिनांक ४ एप्रिल रोजी उच्च न्यायालयातून यांच्या निर्णयालासुद्धा स्थगिती मिळविली. दोन्ही निलंबनाच्या आदेशाला स्थगिती मिळाल्याने प्रतिभा माकोडे यांनी ७ एप्रिल रोजी दुसऱ्यांदा पदभार सांभाळला. दोन्हीही प्रकरणाबाबत अद्यापही निकाल घोषित झालेला नाही. परंतु तिसऱ्या प्रकरणात अपर आयुक्त, अमरावती विभाग यांनी १६ मे २०२४ रोजी प्रदीप वडतकर यांचा अर्ज अमान्य केला होता. प्रदीप वडतकर यांनी अपर आयुक्त, अमरावती विभाग यांच्या १६ मे २०२४ रोजीच्या आदेशाला आव्हान देत ग्रामविकास मंत्री यांच्या न्यायालयात अपील दाखल केले होते. या अपिलावर १५ एप्रिल २०२५ रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी झाली होती. त्यामध्ये ग्रामविकास मंत्र्यांनी, तक्राकर्त्यांचे मुद्दे, लेखी म्हणणे आणि तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर, अपर आयुक्त, अमरावती विभाग यांनी पारित केलेल्या १६ मे २०२४ च्या आदेशात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता असल्याचा निष्कर्ष काढला. त्यानुसार, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम ३९ (३) नुसार प्राप्त अधिकारान्वये मंत्री (ग्रामविकास) यांनी ९ जून २०२५ रोजी प्रदीप वडतकर यांचे अपील मान्य करुन, अपर आयुक्त, अमरावती विभाग यांचा आदेश रद्द केला व १६ जून रोजी मंत्रालयाचे पत्र प्राप्त होताच दिनांक १७ रोजी परत उपसरपंच अमानुल्ला पठाण यांनी प्रभार सांभाळला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande