‘मॅपिंग’ प्रक्रियेत सहभागी व्हा – रायगड जिल्हाधिकारी
रायगड, 03 एप्रिल, (हिं.स.)। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात राबविण्यात येणाऱ्या ‘विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या’ (SIR) पूर्वतयारीला वेग आला असून, रायगड जिल्ह्यात मतदारयादी ‘मॅपिंग’ प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रक्रियेत ना
sir


रायगड, 03 एप्रिल, (हिं.स.)। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात राबविण्यात येणाऱ्या ‘विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या’ (SIR) पूर्वतयारीला वेग आला असून, रायगड जिल्ह्यात मतदारयादी ‘मॅपिंग’ प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रक्रियेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.

सन २००२ मध्ये झालेल्या शेवटच्या सखोल पुनरिक्षणाच्या आधारावर सध्याच्या मतदारयादीतील नावांची जुन्या नोंदींशी सांगड घालण्याचे काम सुरू आहे. यासाठी ‘पर्सन टू पर्सन मॅपिंग’ आणि ‘प्रोजेनी मॅपिंग’ असे दोन प्रकार वापरले जात आहेत. ज्या मतदारांचे नाव २००२ च्या यादीत होते त्यांनी थेट स्वतःचे मॅपिंग करावे, तर नव्या मतदारांनी आपल्या आई-वडील किंवा आजी-आजोबांच्या नोंदीच्या आधारे मॅपिंग करावे.

या प्रक्रियेसाठी २००२ मधील यादीतील भाग क्रमांक (Part No.) आणि अनुक्रमांक (Sr. No.) आवश्यक आहे. हा तपशील भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (https://voters.eci.gov.in) उपलब्ध PDF याद्यांमधून शोधता येणार आहे.

नागरिकांनी ऑनलाईन तपशील मिळवून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करून मॅपिंग पूर्ण झाल्याची खात्री करून घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

“मतदारयादी अधिक पारदर्शक आणि अचूक करण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने यामध्ये सहकार्य करावे,” असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande