रत्नागिरी, 7 जून, (हिं. स.) : जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे पुरुष व महिला जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १३ जूनला डेरवण येथे होणार आहे.
या स्पर्धेतून २१ ते २३ जून दरम्यान पुण्यात येथील शिवछत्रपती संकुलात होणाऱ्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे.
जिल्हास्तरीय स्पर्धेत १८ वर्षांवरील म्हणजेच २८ ऑगस्ट २००० पूर्वी जन्मलेले खेळाडू पात्र ठरतील. राज्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी यूआयडी नंबर असणे आवश्यक आहे. डेरवण क्रीडा संकुल येथे १३ जून रोजी सकाळी ९ वाजता स्पर्धेला प्रारंभ होईल. सर्व खेळाडूंनी ८ वाजेपर्यंत आपली उपस्थिती नोंदवायची आहे. तत्पूर्वी संघटनेच्या गुगल फॉर्मवर आपला प्रवेश निश्चित करावा. प्रवेशिका नोंदविण्याची अंतिम तारीख १० जून आहे.
पुरुष व महिला गटातील खेळाडूंना १०० मी., २०० मी., ४०० मी., ८०० मी., १५०० मी., ५००० मी., १०००० मी., ११० मी. हार्डल्स, ४०० मी. हार्डल्स, ३००० मी. स्टिपलचेस, उंच उडी, लांब उडी, गोळा फेक, थाळी फेक, भला फेक, हातोडा फेक, डेकाथलॉन, हेप्टथलॉन या क्रीडा प्रकारात सहभागी होता येईल. प्रत्येक खेळाडूला किमान दोन क्रीडा प्रकारात सहभागी होता येईल. अधिक माहितीसाठी अविनाश पवार, अजहर खलपे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी